बामखेडा गावात कोरोना आला कुठून?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 12:46 IST2020-05-18T12:46:19+5:302020-05-18T12:46:29+5:30
हितेश पटेल । लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : एकीकडे जिल्ह्यातील शहादा, नंदुरबार व अक्कलकुवा शहरातील कोरोना संक्रमित रुग्ण बरे ...

बामखेडा गावात कोरोना आला कुठून?
हितेश पटेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बामखेडा : एकीकडे जिल्ह्यातील शहादा, नंदुरबार व अक्कलकुवा शहरातील कोरोना संक्रमित रुग्ण बरे होऊन घरी परतत असतानाच बामखेड्यासारख्या खेडेगावात व ग्रामीण भागात नव्याने रुग्ण सापडला असून कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध प्रशासनामार्फत घेण्यात आहे. आष्टे, ता.नंदुरबार नंतर बामखेडा, ता.शहादा येथे कोरोनाने प्रवेश केल्याने प्रशासनला आता ग्रामीण भागात जास्त लक्ष केंद्रीत करुन खबरदारीचे उपाय योजावे लागतील. कोरोनाने बामखेडा गावात प्रवेश कसा केला? याचे गूढ अद्यापही कायम आहे.
बामखेडा त.त., ता.शहादा येथील एक ४५ वर्षीय व्यक्ती नाशिक येथील एका खाजगी रुग्णालयात किडनी आजारासंबंधी उपचार घेत असताना तपासणी केली असता कोरोना संसर्ग झाल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला. त्यामुळे प्रशासनाने रुग्ण जरी बाहेरगावी (नाशिक) असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णांच्या निकटवर्तीयांना व त्याच्यावर उपचार करणाऱ्या तीन स्थानिक डॉक्टरांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. रुग्ण राहत असलेला परिसर व गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
बामखेडा ते नाशिक व्हाया धुळे...
संबंधित व्यक्तीला पोटाचा त्रास होत असल्याने सुरुवातीला दोन दिवस गावातील स्थानिक डॉक्टरांकडे उपचार केले. त्यानंतर वडाळी, ता.शहादा येथील एका डॉक्टरकडे चार दिवस उपचार केल्याचे समजते. पुढील उपचारासाठी धुळे येथील एका खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झाल्यानंतर तपासणीअंती किडनी संबंधित आजार असल्याचे कळाले. त्यानंतर ९ मे रोजी उपचारासाठी नाशिक येथे एका रुग्णालयात रवाना झाल्यानंतर तेथेच उपचार सुरू झाले. उपचारादरम्यान १५ मे रोजी या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. असे असले तरी नेमकी संसर्गाची लागण कुठून झाली हा मात्र प्रशासनासमोर यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.
डिस्चार्ज मिळण्याअगोदरच
अहवाल पॉझिटीव्ह
नाशिक येथील एका मोठ्या रुग्णालयात सहा दिवस उपचार घेतल्यानंतर संबंधित रुग्णाला अहवाल प्राप्त झाला. त्याच दिवशी डिस्चार्ज मिळणार होता, असे समजते. तत्पूर्वीच तापसणीअंती कोरोना संक्रमित झाल्याचा अहवाल आल्याने सारेच अचंबित झाले. असे असले तरी संबंधित रुग्ण हा शेतकरी असूनही त्याची बाहेरगावी जाण्याची कुठलीहीही ट्रॅव्हल हिस्ट्री अद्याप प्राप्त झालेली नाही.
अफवांवर विश्वास ठेवू नये
शनिवारी कोरोनाग्रस्त रुग्ण मयत झाल्याची बातमी पंचक्रोशीत सोशल मिडियावर वाºयासारखी पसरली होती. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या रुग्णाची प्रकृती ठणठणीत असून लवकरच डिस्चार्च देण्यात येईल. अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस पाटील डॉ.योगेश चौधरी यांनी केले आहे.
प्रशासनाने सर्वत्र लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर ग्रामीण भागातही सर्व व्यवहार ठप्प ठेवण्यात आले होते. बामखेडा गावात तर ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस पाटील, ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीने सोशल डिस्टन्सिंगचे पुरेपूर पालन करण्यात येऊन उपाययोजना करण्यात आल्या. शासकीय नियमाप्रमाणे सर्वकाही व्यवहार सुरळीत असताना संबंधित व्यक्तीला कोरोनाची लागण नेमकी कुठून झाली? संबंधित कोरोनाग्रस्त रुग्ण हा शेतकरी कुटुंबातील शेती करणारा आहे. त्यामुळे त्याचा इतरांशी कुठेही संबंध आला नसतानाही गावात कोरोना शिरलाच कसा? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. कोरोना कनेक्शनचे तर्क ज्याच्या त्याच्या मतानुसार लावले जात आहे.