यंदाच्या बजेटने मला काय दिले रे भाऊ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 12:40 IST2021-02-02T12:39:51+5:302021-02-02T12:40:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. महागाई कमी करण्यासाठी ठोस असे काहीही नाही. ...

What did this year's budget give me, brother? | यंदाच्या बजेटने मला काय दिले रे भाऊ ?

यंदाच्या बजेटने मला काय दिले रे भाऊ ?

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. महागाई कमी करण्यासाठी ठोस असे काहीही नाही. इंधनाचे वाढते दराबाबतही उपाययोजनांचा अभाव असल्याचे दिसून येत असल्याचे  अनेकांनी सांगितले. दुसरीकडे कोरोना आणि लॅाकडाऊन यात भरडली गेलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी घेतलेले काही निर्णय स्वागर्ताह असल्याच्याही प्रतिक्रिया उमटल्या.
केंद्रीय अर्थसंकल्प सोमवारी सादर करण्यात आला. वाढती महागाई, कोरोनामुळे रोजगार गेलेले कामगार, बंद पडलेले उद्योग याबाबत ठोस अशी उपाययोजना अपेक्षीत होती मात्र ती दिसून आली नाही असे अनेकांनी सांगितले. वन नेशन वन कार्ड योजना चांगली असून आयकराबाबतची सूट या बाबी दिलासा देणाऱ्या आहेत. जागतिक स्तरावर भारताची अर्थव्यवस्था भक्कम राहावी यासाठी केलेेल्या प्रयत्नांचे स्वागत झाले. 

बसस्थानक
बसस्थानक परिसरात कानोसा घेतला असता अनेकांनी वाढत्या इंधनदराबाबत नाराजी व्यक्त केली. यामुळे पुढील काळात बसभाडे वाढण्याची भिती आहेच. खाजगी वाहन इंधन दरामुळे परवडत नाही. इंधन दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय योजना करण्याची अपेक्षा व्यक्त झाली.


रेल्वेस्थानक
रेल्वे प्रवाशांनी आजच्या बजेटबाबत संमिश्र प्रतिक्रीया व्यक्त केली. खाजगी रेल्वेचा प्रयोग चांगला असला तरी त्यावर सरकारचे नियंत्रण हवे. आपल्या भागासाठी नवीन काहीही नसल्यामुळेही काहींनी नाराजी व्यक्त केली. 

वाढत्या महागाईने महिन्याचे बजेट कोलमडले आहे. महिना सरता सरता नाकीनऊ येतात. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी बजेटमध्ये ठोस निर्णय आवश्यक होता, तो दिसून येत नाही.
-संगिता पाटील, गृहिणी.

कोरोना काळात लहान व्यावसायिकांचे नियोजन कोलमडले आहे. सहजरित्या कर्ज मिळण्यासाठी आवश्यक तरतूद होणे आवश्यक होते, मात्र ते दिसून येत नाही. त्यामुळे पुन्हा कर्जबाजारी व्हावे लागेल.
-गणेश भामरे, किराणा दुकानदार.

कोरोना काळात गेलेला रोजगार आणि कमी झालेले पगार पुर्ववत होण्यासाठी अर्थसंकल्पात तरतुदीची अपेक्षा होती. परंतु उद्योजकांना सवलती देतांना कामगारांना वा-यावर सोडलेले दिसत आहे.
-सुनील मिस्तरी, खाजगी नोकरदार.

आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत युवकांना स्वयंरोजगार देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे बेरोजगारीवर मात करता येईल व युवकांना दिलासा मिळेल.                                                                                                                                               -भूषण पाटील, युवक.

कर स्लॅबची पुनर्रचना नसणे, कर सवलतींबाबत फारसा आशादायक निर्णय नसल्याने व्यापारी वर्गात कही खुशी कही गम अशी स्थिती आहे. आधीच कोरोनामुळे व्यवसाय बुडाला आहे.
-जगदीशभाई जैन, व्यापारी.

पेट्रोलचे व डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्या तुलनेत भाडेवाढ केली तर प्रवासी नाराज होतात. इंधन दरवाढ कमी करावी. छोट्या व्यावसायिकांना दिलासा द्यावा.
-सुरेश शिंपी, ॲाटोचालक.

शेतीमालाला हमी भावाची तरतूद, शेतीसाठी भरीव तरतूद, कृषी कायद्यांची अंमलबजावणी यासह इतर बाबींचा समावेशाने समाधान आहे. परंतु खत, किटकनाशके यांच्या किंमतीवर नियंत्रण हवे.
-भारत पाटील, शेतकरी.

इंधन दरवाढ होत असतांना दुसरीकडे खाजगीकरणाचाही घाट घातला जात आहे. त्यामुळे उद्योग, व्यवसायीक जेरीस येत आहे. खाजगी कंपनीमालक मनमानी करणार, शासनाचा धाक असला पाहिजे. 
-जतीन पटेल, इंधन विक्रेता.

७५ वर्ष वयावरील ज्येष्ठांना कर सवलत देण्यात आली आहे. इतरही काही चांगल्या योजना या बजेटमध्ये आहेत. त्यामुळे ज्येष्ठांना दिलासा मिळाला आहे. उतारवयातील आयुष्यात समाधान आहे.
-पी.के.पाटील, ज्येष्ठ नागरिक.

लहान विक्रेत्यांसाठी असलेल्या कर्ज योजनेसाठी भरघोष निधीची तरतूद असली तरी लघु कर्जांची मर्यादा वाढविणे आणि त्यावरील व्याज कमी करणे आवश्यक आहे. 
-तुकाराम माळी, भाजीपाला विक्रेता.

 

Web Title: What did this year's budget give me, brother?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.