कोरोनाकाळात घटले डाॅक्टरांचे वजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST2021-05-27T04:32:15+5:302021-05-27T04:32:15+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. या लाटेवर नियंत्रण मिळवणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची भूमिका महत्त्वाची ...

कोरोनाकाळात घटले डाॅक्टरांचे वजन
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. या लाटेवर नियंत्रण मिळवणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची भूमिका महत्त्वाची होती. या काळात सर्वच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे वजन घटीला सामोरे गेले असून धावपळीमुळे वजन घटल्याचा दावा त्यांनी केला आहे.
जिल्हा रुग्णालयासह इतर रुग्णालयात वारंवार देण्यात येणाऱ्या भेटी, दिवस आणि रात्रपाळीत केले जाणारे कामकाज यामुळे वैद्यकीय अधिकारी सतत व्यस्त राहत होते. यातून काहींच्या आहारावर परिणाम झाला तर काहींना पुरेशी झोप नसल्याने त्यांना वजनघटीचा सामना करावा लागला. दुसरीकडे अनुभवी अशी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वत:ला शारीरिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी व्यायाम, योग्य आहार याचा आधार घेत कोरोना नियंत्रणासाठी मोठी भूमिका बजावली.
वेळेवर जेवण अन् फळांचा आधार
आठ तासांच्या जवळपास रुग्णसेवा करावयाची असल्याने महिला वैद्यकीय अधिकारी फळे खाण्यावर भर देतात.
बहुतांश महिला डाॅक्टरकडून वेळेवर जेवण नसले तरी फळांना पसंती देत जीवनसत्त्व मिळवण्याकडे लक्ष दिले. घरापासून लांब राहून जिल्हा रुग्णालयातच रहावे लागत असल्याने येथील तेच-तेच अन्न खाऊन वजन कमी झाल्याचे सांगण्यात आले. रात्रपाळीत काम करणाऱ्या पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्यांना धावपळ करावी लागल्याने वजन कमी झाले.
रुग्णालयाचा विस्तार हा मोठा असल्याने अनेकवेळा कर्तव्य बजावत असताना वैद्यकीय अधिकारींची धावपळ होते. यातून शारीरिक थकवाही येत होता.
यातून वजन कमी झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान कोविड वाॅर्डात ड्यूटी करताना मानसिक थकव्यातूनही अडचणी आल्या.
कोविड वाॅर्डात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी यासाठी सातत्याने सूचना केल्या आहेत. डाॅक्टर्स मंडळींना चांगले जेवण मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले गेले आहेत. यातून एकाही डाॅक्टराला अपाय झालेला नाही. धावपळीमुळे वजन कमी होते.
-डाॅ. आर.डी. भोये,
जिल्हा शल्यचिकित्सक
कोरोना ड्यूटी करणाऱ्या बहुतांश महिला वैद्यकीय अधिकारी किंवा परिचारिका ह्या स्वत:च्या आराेग्यविषयी जागरुक असल्या पाहिजेत. या काळात काम करताना स्वत:चे आरोग्य चांगले राहिल्यास इतरांची सेवा होईल. सततच्या कामामुळे अनेकींना वजनघटीचा सामना करावा लागला.
-डाॅ. सुलोचना बागुल,
वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय
जिल्हा रुग्णालयात एकूण ९५ परिचारिका ह्या काम करतात. त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे कायम सांगत आली आहे. बऱ्याचवेळा रुग्णसेवेत त्या जेवणाकडे दुर्लक्ष करतात. परंतु रुग्णालय प्रशासनाने या सर्व परिचारिकांना योग्य डाएट प्लान देत कामे करून घेतली.
-नीलिमा वळवी,
मेट्रन, जिल्हा रुग्णाालय, नंदुरबार.