खबरदारीविनाचा भरला आठवडे बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 21:02 IST2020-10-21T21:02:39+5:302020-10-21T21:02:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी बंद ठेवण्यात आलेले आठवडे बाजार सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी ...

खबरदारीविनाचा भरला आठवडे बाजार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी बंद ठेवण्यात आलेले आठवडे बाजार सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले होते. या आदेशानंतर सात महिन्यानंतर नंदुरबार शहरातील आठवडे बाजार सुरू झाला आहे. सात महिन्यानंतर सुरू झालेल्या या बाजाराला माहितीअभावी तुरळक प्रतिसाद मिळाला.
शहरातील मंगळबाजार, भोईगल्ली, मढी चाैक यासह घी बाजारपर्यंत आठवडे बाजार भरण्याची शतकाची परंपरा आहे. परंतू गेल्या सात महिन्यापूर्वी लाॅकडाऊन घोषित झाल्यानंतर हा बाजार बंद झाला होता. दर मंगळवारी परीसरातील आदिवासी बांधवांसह जवळपासचे भाजीपाला व इतर चीजवस्तू विक्रेते या बाजारात हजेरी लावत होते. परंतू बाजार बंद असल्याने त्यांचा रोजगार बुडाला होता. मंगळवारी बाजार सुरू होणार अशी माहिती नसल्याने यातील अनेक जण बाजारात येवू शकलेले नाहीत. दरम्यान सात महिन्यानंतर बाजार सुरू झाला असला तरी खबरदारीचे उपाय म्हणून काहीही करण्यात आलेले नसल्याचे दिसून आले. प्रामुख्याने सॅनेटायझर्स, मास्क यांचा वापर करणे गरजेचे असताना व्यावसायिक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले. प्रशासनाकडूनही बाजार सुरू झाला असताना नागरीकांना कोणत्याही सूचना करण्यात आलेल्या नव्हत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग करणे गरजेचे असताना शहरातील अरुंद गल्ल्यांमध्ये जागा पटकावून बसलेल्या भाजीपाला विक्रेत्या महिलांमुळे वाहतूकीस अडथळा येत होता.
शहाद्यातही भरला आठवडे बाजार
दरम्यान एकीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले असताना नंदुरबार नगरपालिकेने खाली बसून भाजीपाला विक्री करणारे तसेच दुकानाबाहेर सामान ठेवून अडथळा निर्माण करत सोशल डिस्टन्सिंगचा भंग करणार्या विक्रेत्यांवर कारवाई केली होती. पालिकेने नियुक्त केेलेले वाहन बाजारात दिवसभर सूचना करत फिरत होते. बाजारपेठेत खाद्यपदार्थ विक्रेते तसेच रस्त्यावर कापड विक्री करणार्यांकडे गर्दी होत होती. दरम्यान नंदुरबार सोबतच शहादा येथेही मंगळवारी आठवडे बाजार भरवण्यात आला होता. याठिकाणीही नागरीकांनी गर्दी केल्याची माहिती आहे. दरम्यान तहसील प्रशासन पुढील आठवड्यापासून आठवडे बाजारात पथक नियुक्त करणार असल्याची माहिती दिली गेली आहे.