मजुरांना स्थानिक ठिकाणीच रोजगार देऊन स्वावलंबी बनविणार - पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:36 IST2021-08-17T04:36:06+5:302021-08-17T04:36:06+5:30

ॲड. पाडवी म्हणाले, शासनाच्या प्रयत्नात जनतेचा सहभाग आवश्यक आहे. कोरोनाकाळात राज्यातील आदिवासी बांधवांना दिलासा देण्यासाठी खावटी अनुदान योजना सुरू ...

We will make the workers self-reliant by providing employment in local places - Guardian Minister | मजुरांना स्थानिक ठिकाणीच रोजगार देऊन स्वावलंबी बनविणार - पालकमंत्री

मजुरांना स्थानिक ठिकाणीच रोजगार देऊन स्वावलंबी बनविणार - पालकमंत्री

ॲड. पाडवी म्हणाले, शासनाच्या प्रयत्नात जनतेचा सहभाग आवश्यक आहे. कोरोनाकाळात राज्यातील आदिवासी बांधवांना दिलासा देण्यासाठी खावटी अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ४३ हजार ५८१ नागरिकांच्या बँक खात्यावर एकूण २८ कोटी ७२ लाख ६२ हजार रुपये जमा करण्यात आले असून ६४ हजार ३४४ आदिवासी कुटुंबांना खावटी किट वितरित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एक लाख ५४ हजार ९१२ कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय, सुसज्ज ग्रंथालय, ट्राॅमा केअर सेंटर, आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृह इमारती, प्राथमिक आरोग्य केंद्र इमारती अशा विविध सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती देण्यात येत आहे. जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. सामूहिक प्रयत्नांच्या बळावर जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार पिके घ्यावीत. शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या ई-पीक पाहणी कार्यक्रमात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. संकटकाळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ऑलिम्पिक स्पर्धेत केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल त्यांनी भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले. जिल्ह्यातील युवक-युवतींमध्येदेखील खेळात पुढे जाण्याची क्षमता असून त्यांना प्रोत्साहन देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री पाडवी यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक देशभक्तांनी बलिदान दिल्याचे सांगितले. शहीद शिरीषकुमार आणि त्याचे साथीदार, रावलापणी येथे हौतात्म्य पत्करलेले स्वातंत्र्यसैनिक, चिमठाणा येथे इंग्रजी खजिन्याची लूट करणारे स्वातंत्र्यसैनिक, बिरसा मुंडा आणि अन्य आदिवासी स्वातंत्र्य योद्ध्यांचे योगदान मोलाचे असल्याचे ते म्हणाले. देशाला प्रगतिपथावर पुढे नेण्यासाठी विविध क्षेत्रांतील नागरिकांचे योगदान असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Web Title: We will make the workers self-reliant by providing employment in local places - Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.