जवानांवरील हल्ल्याने नंदुरबारात संतापाची लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 20:36 IST2019-02-16T20:36:11+5:302019-02-16T20:36:18+5:30
कडकडीत बंद : प्रतिकात्मक पुतळे जाळून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा, शहीद जवानांना श्रध्दांजली

जवानांवरील हल्ल्याने नंदुरबारात संतापाची लाट
नंदुरबार : जम्मू-कश्मिर येथील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) वाहनताफ्यावर झालेल्या हल्ल्यात चाळीसहून अधिक जवान शहीद झाले़ या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी नंदुरबार शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शंभरटक्के कडकडीत बंद पाळण्यात आला़ विविध ठिकाणी शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली़
गुरुवारी जम्मू-काश्मिर येथील पुलवामा येथील राजमार्गावरुन जात असलेल्या सीआरपीएफच्या जवानांवर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून आत्मघातकी हल्ला करण्यात आला़
या घटनेत चाळीसहून अधिक जवान शहीद झाले आहे़ याचे पडसाद राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर उमटताना दिसून येत आहे़ या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील नागरिक शनिवारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले़ नंदुरबारात शंभर टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला़ यासह अक्कलकुवा, तळोदा आदी ठिकाणीही नागरिक, व्यापाऱ्यांनी बंदत सहभाग घेतला होता़ नंदुरबारात ठिकठिकाणी पाकिस्तानचे प्रतिकात्मक पुतळे तसेच ध्वज जाळण्यात आले़ पाकिस्तान मुर्दाबाद, जब तक सुरज चाँद रहेगा भारत तेरा नाम रहेगा, अशा घोषणा देण्यात आल्या़
प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
नंदुरबार येथील महाराष्ट्र व्यायामशाळा परिसरात नागरिकांकडून शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली़ तसेच पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत प्रतिकात्मक पुतळ्याचेही दहन करण्यात आले़ भारतीय सैन्यावर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांना चोख प्रत्युंत्तर देण्याची वेळ आली असून पाकिस्तानात घुसून शस्त्रूला ठार करा अशा तीव्र भावना तरुणांकडून व्यक्त करण्यात येत होत्या़
व्यापारी संकुले कडकडीत बंद
नंदुरबारात सकाळपासून नागरिक तसेच व्यापाºयांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला होता़ संपूर्ण दिवसभर व्यापारी संकुलने बंद होती़ ऐरवी वर्दळीमुळे गजबजलेले रस्ते शनिवारी ओस पडले होते़ सराफा बाजारातदेखील शुकशुकाट बघायला मिळाला़
शहरात चौकाचौकात शहीदांना श्रध्दांजली वाहण्यासाठी पोस्टर्स लावण्यात आले होते़ शहीदांचे हे बलिदान व्यर्थ न जावो अशीच आर्त हाक सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत होती़
विविध संघटनांचा बंदला प्रतिसाद
विविध संघटनांकडून नंदुरबार बंदला प्रतिसाद देण्यात आला होता़ दुकाने बंद करा अशी सांगण्याची वेळदेखील आली नाही़ सर्व व्यापारी वर्गाने उत्स्फूर्तपणे बंदत सहभाग घेतला होता़ त्याच प्रमाणे सर्व व्यापºयांकडून शहरातून रॅली काढण्यात आली होती़ शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यासाठी कँण्डल मार्च काढण्यात आला होता़ यात, तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता़ नंदुरबारातील शाळा, महाविद्यालयांमध्येही शहीदांना श्रध्दांजली वाहण्यात आली़ नंदुरबार शहरात असलेले सर्व नियोजीत कार्यक्रम रद्द करण्यात आले होते़ शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला होता़