नादुरूस्त हातपंपमुळे पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 12:03 IST2019-05-14T12:03:05+5:302019-05-14T12:03:29+5:30
लक्कडकोट व खर्डी येथील स्थिती : प्रशासनाचे तात्काळ उपाययोजनेचे आश्वासन

नादुरूस्त हातपंपमुळे पाणीटंचाई
तळोदा : हातपंप दुरूस्तीबाबत वारंवार पंचायतीकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने पुरेशा पाण्याअभावी लक्कडकोट व खर्डी येथील ग्रामस्थांचे हाल होत आहे.
दरम्यान या गावातील काही रहिवाशांनी सोमवारी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी ना दुरूस्त हातपंप तातडीने दुरूस्त करण्याची मागणी केली. दरम्यान गटविकास अधिकाऱ्यांनी उद्याच हातपंप दुरूस्ती पथक गावात पाठविण्याचे आश्वासन दिले.
तळोदा तालुक्यातील खर्डीखुर्द ग्रामपंचायतीतील खर्डी व लक्कडकोट या गावांमध्ये ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासाठी साधारण १६ हातपंप केले आहेत. त्यापैकी निम्मे हातपंप नादुरूस्त झाल्यामुळे पाच ते सहा महिन्यांपासून बंद पडले आहेत. जे काही सुरू आहेत त्यातूनही वाढत्या तापमानामुळे कमी पाणी निघत आहे. साहजिकच पुरेशा पाण्याअभावी येथील गावकºयांचे प्रचंड हाल होत आहे. आधीच या दोन्ही ठिकाणी विखुरलेली लोकवस्ती आहे. त्यामुळे ज्या ठिकाणांच्या हातपंपावर पाणी आहे तेथे दूरवर जावून इतर रहिवाशांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत असते. एवढे करूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याने खर्डी व लक्कडकोट येथील रहिवाशांनी सोमवारी तळोदा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी गावामधील सर्वच हातपंपांची चौकशी करून ही हातपंपे तातडीेने दुरूस्ती करावी, अशी मागणी केली. केवळ नादुरूस्त हातपंपामुळे आम्हाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे गावकºयांनी सांगितले.
वास्तविक यंदा अत्यंत कमी पर्जन्यमान झाले आहे. अशा वस्तुस्थितीमुळे पंचायतीने पाणीटंचाईच्या उपाययोजनांबाबत सजग राहणे आवश्यक होते. मात्र तशी सजगता दाखविण्यात आली नाही. याउलट नादुरूस्त हातपंपाबाबत तोंडी तक्रारी करूनही त्याकडे गांभीर्याने लक्ष घालण्यात आले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्याचबरोबर ही हातपंप दुरूस्त न झाल्यास टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणीदेखील या रहिवाशांनी केली. दरम्यान गटविकास अधिकारी खर्डे यांनी गावकºयांची तक्रार ऐकूण घेतल्यानंतर उद्याच दुरूस्ती पथक गावात पाठवून हातपंप दुरूस्त करण्याचे आश्वासन दिले.
या वेळी गावकºयांनी त्यांना निवेदन दिले होते. या निवेदनावर राजेंद्र पाडवी, संजय पाडवी, तिरसिंग पाडवी, रेगला वसावे, कुवरसिंग वळवी, दिलीप वळवी, राकेश पाडवी, दिलवर पाडवी, युवराज पाडवी, रमेश वळवी, संभू वसावे, सिपा वळवी, देविसिंग वसावे, रेवा वळवी, गिबजी वसावे, विजय वळवी, राकेश वसावे, पांड्या वसावे, भिका तडवी आदींच्या सह्या आहेत.