जून अखेरपर्यंत पाण्याचे नियोजन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 11:55 IST2019-05-11T11:55:23+5:302019-05-11T11:55:29+5:30

पाणी टंचाई आढावा : सामाजिक संघटना व आदिवासी ग्रामस्थांसोबत आढावा बैठक

Water planning till the end of June | जून अखेरपर्यंत पाण्याचे नियोजन सुरू

जून अखेरपर्यंत पाण्याचे नियोजन सुरू

नंदुरबार : ५२ गावांमध्ये विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. ३४ ठिकाणी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. सातपुड्यातील दुर्गम भागात पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी कामे सुरू आहेत. तरीही प्रश्न कायम राहत असतील तर तातडीने नवीन प्रस्ताव तयार करावे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गाव, पाड्यांपर्यंत जावे अशा सुचना जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी सामाजिक संघटना व आदिवासी ग्रामस्थांसोबत झालेल्या पाणी टंचाई आढावा बैठकीत बोलतांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, सहायक जिल्हाधिकारी वान्मती सी. , उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर आदी उपस्थित होते. मंजुळे म्हणाले, तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी टंचाईग्रस्त गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधावा. गावातील पाण्याची गरज आणि उपलब्ध स्त्रोतांची माहिती घ्यावी. ३० जूनपर्यंत पाणी उपलब्ध होईल असे स्त्रोत शोधून ठेवावेत. पाणी पुरवठा योजनेच्या स्त्रोतातील पाणी कमी होत असल्यास पर्यायी स्त्रोताचा शोध घ्यावा. नळपाणी पुरवठा योजनेची अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करावी. आवश्यकतेनुसार विंधनविहीरींची कामे घेण्यात यावी. गावातील नागरिकांचे स्थलांतर होऊ नये म्हणून रोजगार हमी योजनेअंतर्गत मागणीनुसार तात्काळ काम उपलब्ध करून द्यावे.
जिल्हाधिकाºयांनी प्रत्येक तालुक्यातील टंचाई परिस्थिती आणि प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांचा गावनिहाय आढावा घेतला. अधिकाºयांनी ग्रामीण भागातील पाण्याच्या उपलब्धतेविषयी नियमित आढावा घेऊन नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश अधिकाºयांना दिले. गावांना भेट देऊन तेथील संभाव्य उपाययोजनेविषयी तात्काळ अहवाल सादर करावा, असे त्यांनी सांगितले.
या तालुक्यातील आदिवासी बांधवांशी संवाद साधताना जिल्हाधिकाºयांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. रोजगार हमी योजने अंतर्गत कामांची उपलब्धता, पिण्याचे पाणी, चारा छावणी, वृक्ष लागवड कार्यक्रम, आदिवासी उपयोजनेअंतर्गत विहिरींची कामे, विंधन विहीरींची कामे आदी विविध विषयांसंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. दुर्गम भागातील गावांसाठी चारा छावणी सुरू करण्याबाबत ग्रामस्थांशी चर्चा करावी व त्यांचे प्रस्ताव घेऊन त्वरीत कार्यवाही करावी अशा सुचनाही त्यांनी दिली.
लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, विजय ब्राम्हणे, मुकेश वळवी, गणेश पराडके, संजय महाजन, दिलवर पाडवी, अशोक पाडवी, यशवंत ठाकरे, बोखा पाडवी, जगन पाडवी, प्रभाकर वसावे, झिलाबाई वसावे उपस्थित होते.

Web Title: Water planning till the end of June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.