नंदुरबारातील १७३ गावांमध्ये वॉटर कप स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 17:49 IST2019-04-07T17:49:27+5:302019-04-07T17:49:56+5:30
पाणी फाउंडेशन : आजपासून होणार सुरुवात

नंदुरबारातील १७३ गावांमध्ये वॉटर कप स्पर्धा
नंदुरबार : जिल्ह्यातील १७३ गावे यंदा पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाले आहेत़ स्पर्धेला ७ एप्रिलपासून सुरुवात होत असून यांतर्गत विविध जलसंधारणाची कामे सुरु होणार आहेत़
गेल्यावर्षापासून जिल्ह्यात पाणी फाउंडेशनतर्फे वॉटर कप स्पर्धा सुरु करण्यात आली होती़ पहिल्या वर्षात मिळालेला प्रतिसाद दुसऱ्या वर्षीही कायम असून श्रमदानातून जलसंधारण ही संकल्पना यंदाही राबवली जात आहे़ नंदुरबार तालुक्यातील १०२ गावे स्पर्धेत सहभागी झाली आहेत़ यासाठी २६१ पुरुष आणि २३७ महिलांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे़ शहादा तालुक्यातील ७१ गावातील २६१ पुरुष आणि ९३ महिला प्रशिक्षणात सहभागी झाल्या होत्या़ त्यांना जलसंधारणबाबत माहिती देण्यात आली होती़
७ एप्रिल रोजी मध्यरात्रीपासून नंदुरबार तालुक्यातील वावद, तिसी, कार्ली, ढंढाणे, मांजरे, बलदाणे, कोठली खुर्द, अजेपूर, कोठडे, केसरपाडा, शिवपूर, पथराई, लोय, जळखे, धमडाई, नगाव तर शहादा तालुक्यात मानमोड्या, जयनगर, नवानगर, जाम, गोगापूर, काथर्दे खुर्द, अंबापूर, कहाटूळ, लोंढरे, कोळपांढरी, कोठली तर्फे सारंगखेडा, कानडी तर्फे शहादा (खुर्द), धांद्रे (खुर्द) कळंब, हिंगणी आणि भुलाणे येथे विविध जलसंधारणाच्या कामांना सुरुवात होणार आहे़
दरम्यान नंदुरबार तालुक्यातील कोठली खुर्द येथे नाम फाउंडेशनतर्फे जलसंधारणाच्या कामासाठी पोकलँड मशीन उपलब्ध करुन देण्यात आले आहे़ मशिनचे पूजन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्याहस्ते करण्यात आले़ यावेळी गटविकास अधिकारी अशोक पटाईत, नाम फाउंडेशनचे जितेंद्र पाटील, ग्रामविस्तार अधिकारी वाय़डी़पवार, ग्रामविकास अधिकारी आऱडी़पवार, दिपक पाटील, सागर पटेल, विलास पाटील, शिरीष पाटील, प्रल्हाद पाटील आदी उपस्थित होते़
पोकलँड मशिनची गावात मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले़