पालखी सोहळा व्हावा हेच वारकऱ्यांचे शासनाला मागणे, आषाढी वारीबाबत भाविकांचे शासन निर्णयाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST2021-06-04T04:23:16+5:302021-06-04T04:23:16+5:30

वारकरी सांप्रदाय आणि तमाम भाविक भक्तांना आषाढी एकादशी निमित्ताने शेकडो वर्ष सुरू असलेली वारीची ओढ लागली आहे. आषाढी एकादशी ...

Warakaris demand government to hold Palkhi ceremony, devotees pay attention to government decision regarding Ashadi Wari | पालखी सोहळा व्हावा हेच वारकऱ्यांचे शासनाला मागणे, आषाढी वारीबाबत भाविकांचे शासन निर्णयाकडे लक्ष

पालखी सोहळा व्हावा हेच वारकऱ्यांचे शासनाला मागणे, आषाढी वारीबाबत भाविकांचे शासन निर्णयाकडे लक्ष

वारकरी सांप्रदाय आणि तमाम भाविक भक्तांना आषाढी एकादशी निमित्ताने शेकडो वर्ष सुरू असलेली वारीची ओढ लागली आहे. आषाढी एकादशी एक महिन्यावर येऊन ठेपली की नंदुरबार जिल्ह्यातील हजारो वारकऱ्यांचे पाय पंढरपूरच्या दिशेने निघतात. जवळपास एक महिना मजल दरमजल करीत हे वारकरी भक्तीरसात तल्लीन होऊन विठूरायाला भेटायला जातात.

मागील वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने वारी बंद करून प्रातिनिधिक स्वरूपात वारी काढून आषाढी साजरी केली होती.

यंदादेखील कोरोनाचे संकट अजूनही गडद आहे. रुग्ण संख्या मंदावली असली तरी कोरोना आटोक्यात आलेला नाही. अजूनही राज्यातील संख्या १० हजारी पार आहे. त्यामुळे शासन स्तरावर वारीसंदर्भात कोणता निर्णय घेतला जातो याकडे राज्यातील तमाम वारकऱ्यांचे लक्ष लागून आहे. शेकडो वर्षाची परंपरा खंडित करून भाविकांचा अंत न पाहता वारीत जाणाऱ्या प्रत्येक भाविकांची कोरोना चाचणी करून त्यांना लस देऊन यंदा वारीचा सोहळा व्हावा, अशी मागणी वारकरी संप्रदायाचे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे खान्देश विभाग प्रमुख हभप ज्ञानेश्वर महाराज माळी नंदुरबारकर यांनी केली आहे. वारकऱ्यांची संख्या आणि ज्या गावातून हा सोहळा जाणार आहे त्या गावच्या दोन किलोमीटर अंतरावर मुक्काम ठेऊन इतर गावांना त्रास होणार नाही याची काळजी घेत मर्यादित स्वरूपात का होईना; पण हा सोहळा झाला पाहिजे, असे मत हभप राकेश महाराज अग्निहोत्री यांनी व्यक्त केले. वारीची तयारी करण्यासाठी भाविकांना काही दिवस वेळ हवा असतो. त्यामुळे शासन काय निर्णय घेते, मागील वर्षाप्रमाणे यंदा सोहळा रद्द होणार की निवडक वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणार याकडे वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

वारी संदर्भात ठळक मुद्दे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीत खंड पडू नये म्हणून वारी व्हावी मात्र ही वारी सुरक्षा वारी असावी, असे मत भाविकांकडून व्यक्त होत आहे.

निवृत्ती महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान त्र्यंबकेश्वर येथून २७ दिवस अगोदर होत असते. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून राज्यात लॉकडाऊन सुरू असून संचारबंदी कायम आहे तर सर्व धार्मिकस्थळ भाविकांनी बंद ठेवली आहे.

गेल्यावर्षी शासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच संतांच्या पालखीचा सोहळा रद्द केला होता. वारीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून शासनाच्या जबाबदारीवर प्रमुख निवडक संतांच्या पादुका २० वारकऱ्यांसमवेत एसटी महामंडळाच्या वतीने बसद्वारे पंढरीला विठूरायाच्या चरणी नेण्यात आल्या होत्या. वास्तविक शासनाने दिलेल्या नियमानुसार लाखो भाविकांनी आषाढी घरीच साजरी केली होती.

Web Title: Warakaris demand government to hold Palkhi ceremony, devotees pay attention to government decision regarding Ashadi Wari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.