खापर येथील साडेअकरा लाखांच्या चोरीचे गूढ उकलण्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:34 IST2021-08-20T04:34:57+5:302021-08-20T04:34:57+5:30
खापर : अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे साडेअकरा लाखांची धाडसी घरफोडी १५ दिवसांपूर्वी घडली होती; परंतु या गुन्ह्याची उकल अद्यापही ...

खापर येथील साडेअकरा लाखांच्या चोरीचे गूढ उकलण्याची प्रतीक्षा
खापर : अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे साडेअकरा लाखांची धाडसी घरफोडी १५ दिवसांपूर्वी घडली होती; परंतु या गुन्ह्याची उकल अद्यापही झालेली नसल्याने परिसरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या घरफोडीचा तपास तातडीने करण्यात येऊन आरोपींना जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. खापर गावातील पोलीस दूरक्षेत्रापासून हाकेच्या अंतरावरील वाडिले नगरात २६ जुलैला धाडसी घरफोडी झाली होती. त्यात १० लाख ५० हजार रोख व १ लाख २० हजार रुपयांची २ किलो चांदीचे दागिने चोरी झाल्याची तक्रार वरदाराम पोलाराम चौधरी यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
२६ जुलैच्या घटनेनंतर तब्बल पाचव्या दिवशी या चोरीची माहिती पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. त्यातून चोरी करणाऱ्या चोरट्यांचे ठसे पुसले जावून पोलिसांना शोध घेणे कठीण झाले आहे. २० दिवस होऊनही चोरीचा तपास लागलेला नसल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. खापर व परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. मोटारसायकलीतील पेट्रोल चोरीचे प्रकार नित्याने घडत आहेत.
खापर पोलीस दूरक्षेत्रात सध्या सहा कर्मचारी नियुक्त आहेत. त्यातील दोघे कर्मचारी अक्कलकुवा पोलीस स्टेशनला ड्युटी करतात. एकाची साप्ताहिक सुटी असली तर दोघा-तिघांवर दूरक्षेत्राची जबाबदारी येते. कर्मचारी कमी असल्याने दैनंदिन कामांमध्ये अडथळे येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे याठिकाणी कर्मचारी वाढीची मागणी करण्यात आली आहे.
खापर व परिसरातील सीमावरील गावामध्ये जुगाराचे अड्डे सुरू आहेत. त्या ठिकाणी गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर लोक जुगार खेळण्यासाठी येत असून त्यांचा वावर खापर परिसरात होतो. त्यामुळे खापर परिसरात चोरीच्या घटना वाढल्या असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे सोबत मद्याची वाढती तस्करीही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.