शस्त्रधारी चोरट्यांच्या दहशतीत ग्रामस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 18:52 IST2019-04-12T18:52:46+5:302019-04-12T18:52:53+5:30
बोरद परिसर : शेतातील व घरातील धान्य, शेतीउपयोगी वस्तूंवर लक्ष

शस्त्रधारी चोरट्यांच्या दहशतीत ग्रामस्थ
बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद शिवारात सध्या चोरट्यांनी हैदोस घातलेला आहे़ अनेक वेळा बंद घर फोडण्याचा प्रयत्नही करण्यात आला, परंतु ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यात यश आल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे़
गेल्या दोन दिवसांपासून येथील ग्रामस्थ प्रचंड दहशतीखाली आहेत़ चोरट्यांनी बोरद येथील राहुल बन्सी पाटील व विलास काशीनाथ पाटील यांच्या घराचा कडीकोंडा तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला होता़ प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार चोरट्यांच्या हातात, चाकू, सुरी तसेच इतर धारदार शस्त्रास्त्रेही दिसून आली आहेत़ त्यामुळे साहजिकच ग्रामस्थांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झालेले दिसून यत आहे़
शेतीची साहित्य व धान्य चोरण्याचा होतोय प्रयत्न
दरम्यान, चोरट्यांकडून बंद घर फोडून शेतकऱ्यांनी पोत्यात भरलेले हरभरे, शेती उपयोगी साहित्य, तसेच इतर धान्यांची चोरी करण्यात येत आहे़ परंतु अनेक वेळा चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना ग्रामस्थांकडून चोरट्यांना हटकण्यात आलेले आहे़ मागील वर्षीही लक्ष्मण यशवंत पाटील यांच्या घरातील २५ तोळे सोने व पैसे चोरांनी चोरुन नेले होते़ अजूनही संबंधित चोरटे पोलीसांनी जेरबंद केलेले नाहीत़ त्यामुळे ग्रामस्थांकडून नाराजीही व्यक्त करण्यात येत आहे़ सतत चोरीच्या घटना होत असल्याने ग्रामस्थांना रात्रीदेखील शांत झोप लागत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे़ दरम्यान, अनेक वेळा बोरद पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचाऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी विविध कामांनिमित्त पाठविण्यात येत असते़ त्यामुळे बोरद येथील पोलीस दूरक्षेत्रात कर्मचारी नसतात़ त्यामुळे स्थानिक ठिकाणी गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांना अपयश येत असते़ याबाबत बोरद येथील ग्रामस्थ दत्तात्रय पाटील, मंगसिंग चव्हाण, मंगेश पाटील, योगेश पाटील, मनिष पाटील, सुभाष पाटील, नीलेश पाटील, सुभाष राजपूत, लक्ष्मीकांत पाटील, संदीप जव्हेरी, देविदास कुंभो, जयसिंग ठाकरे आदींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़