पाणीपुरवठा योजना सुरू झाल्याने ग्रामस्थांनी साजरा केला आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:29 IST2021-04-10T04:29:55+5:302021-04-10T04:29:55+5:30
तळोदा तालुक्यातील धजापाणी हे साधारण २५० लोकवस्तीचे गाव. ते सातपुड्याच्या कुशीत वसलेले आहे. गावात रस्त्यांचीही वानवा आहे. पिण्याच्या पाण्याची ...

पाणीपुरवठा योजना सुरू झाल्याने ग्रामस्थांनी साजरा केला आनंदोत्सव
तळोदा तालुक्यातील धजापाणी हे साधारण २५० लोकवस्तीचे गाव. ते सातपुड्याच्या कुशीत वसलेले आहे. गावात रस्त्यांचीही वानवा आहे. पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे येथील रहिवाशांना गावापासून नजीक असलेल्या झऱ्याचा आसरा घ्यावा लागत आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीतही गावकऱ्यांना घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. गावकऱ्यांची ही व्यथा ऐकून आमदार राजेश पाडवी यांनी आपल्या निधीतून चार हातपंपासाठी चार लाख रुपये मंजूर केले होते. त्यांच्या निधीतील हातपंपांचे भूमिपूजन मालदा ग्रामपंचायतीचे सरपंच गोपी पावरा यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर ग्रामपंचायतीने पेसा निधीतून अडीच लाख रुपये खर्चाची हाळ व विहीरदेखील केली आहे. साहजिकच यामुळे या गावाचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागला आहे. मालदा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या या कामाचे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या वेळी ग्रामपंचायत सदस्य बेताब पावरा, ओजऱ्या पावरा,डोंगर पावरा, गोरख पावरा, उत्तम पावरा, दयानंद वळवी, गौतम पावरा, पिंटू पावरा व ग्रामस्थ उपस्थित होते.
धजापणी गाव मालदा ग्रामपंचायत अंतर्गत येते. तेथे पाण्याची मोठी समस्या होती. त्यासाठी आमदार निधीतून चार हातपंप व हाळ व विहीर पूर्ण केली आहे. त्यामुळे या गावाचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यात आला आहे.
-करूणाबाई गोपीनाथ पावरा, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत मालद, ता.तळोदा
सातपुड्याच्या दुर्गम भागात आमचे गाव वसलेले आहे. पाण्याची मोठी समस्या होती. झऱ्याचे पाणी प्यावे लागत होते. मात्र ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. त्यामुळे खूपच आनंद होत आहे.
-डोंगरसिंग पावरा, ग्रामस्थ, धाजापाणी, ता.तळोदा