ग्रामस्वच्छता अभियानाच्या पुरस्कारासाठी ग्रामस्थ सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 12:29 IST2020-02-02T12:29:41+5:302020-02-02T12:29:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातर्फे गावाला राज्यस्तरीय स्पर्धेत पुरस्कार मिळविण्यासाठी ग्रामस्थ सज्ज झाले असून, या ...

ग्रामस्वच्छता अभियानाच्या पुरस्कारासाठी ग्रामस्थ सरसावले
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातर्फे गावाला राज्यस्तरीय स्पर्धेत पुरस्कार मिळविण्यासाठी ग्रामस्थ सज्ज झाले असून, या स्पर्धेच्या निकषाविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन करणेसाठी नंदुरबार जिल्ह्यातील लहान कडवान तालुका नवापूर येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली.
लहान कडवान ता.नवापूर या ग्रामपंचायतीला सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत विभागस्तरावर द्वितीय क्रमांक विभागून मिळाला आहे. यामुळे या गावाची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय स्पर्धेत ग्रामपंचायतीला क्रमांक मिळावा, याकरिता राज्यस्तरीय तपासणी समितीकडून ग्रामपंचायती अंतर्गत राबविलेल्या उपक्रमांना कशा प्रकारे गुणांकन केले जाणार आहे? याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा पार पडली.
यावेळी डॉ.फडोळ यांनी लहान कडवाण ग्रामपंचायत राज्यस्तरीय स्पर्धेत पात्र झाल्याबद्दल ग्रामस्थांचे अभिनंदन केले. तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत कोणत्या प्रकारे गुणांकन केले जाते त्यासाठी लोकसहभाग, गावात वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता कशी राखता येईल, गाव परिसरात फुलझाडे, वृक्ष संवर्धन, जनावरांच्या मलमूत्राचे व्यवस्थापन कसे करता येईल, सांडपाणी व्यवस्थापानाच्या माध्यमातून डासांचे निर्मूलन कसे करता येईल, घनकचरा व्यवस्थापन, कंपोस्ट खत, गांडूळ खत, ओला कचरा व सुका कचरा याचे वर्गिकरण, प्रत्येक घरात शुद्ध व नियमित पिण्याचे पाणी मिळण्यासाठी व पाणी साठवण व हाताळणी याबाबत मार्गदर्शन केले.
त्यांनी पुढे बोलतांना शौचालय बांधकाम, त्याचा नियमित वापर याविषयी लोकसहभाग वाढविण्याबाबत ग्रामस्थांना प्रोत्साहीत केले. या वेळी सरपंच गोविंद वाऱ्या गावीत, उपसरपंच वंदना सुभाष पाडवी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, स्वच्छ भारत मिशन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुनील पाटील, समाजशास्त्रज्ञ कैलास कांजरेकर, क्षमता बांधणी तज्ञ योगेश कोळपकर, गुलाबसिंग वळवी, मनोहर सूर्यवंशी, अंकुश शिंदे, अश्विन निंबाळकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.