गावातील युवक बनतील आता ‘शिक्षणमित्र’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:29 IST2021-05-16T04:29:54+5:302021-05-16T04:29:54+5:30
कोठार : अनलॅाक लर्निंग-२ अंतर्गत आता आश्रमशाळांमध्ये शिक्षण मित्र संकल्पना राबविली जाणार आहे. त्यासाठी गावातील शिक्षित तरुणांचा सहभाग घेतला ...

गावातील युवक बनतील आता ‘शिक्षणमित्र’
कोठार : अनलॅाक लर्निंग-२ अंतर्गत आता आश्रमशाळांमध्ये शिक्षण मित्र संकल्पना राबविली जाणार आहे. त्यासाठी गावातील शिक्षित तरुणांचा सहभाग घेतला जाणार आहे. गेल्या वर्षीदेखील स्टडी फॅार होमअंतर्गत आश्रम शाळा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न झाला होता.
येते शैक्षणिक वर्षदेखील कधी सुरू होते याकडे लक्ष लागून आहे. त्यामुळे गेल्या वर्षासारखी परिस्थिती राहिल्यास आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत आता शिक्षणमित्र ही संकल्पना पुढे आली आहे.
या संकल्पनेंतर्गत गावातील १२वी उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा पुढील शिक्षण झालेल्या गावातील एका तरुणाची किंवा विद्यार्थी संख्येच्या प्रमाणानुसार एकापेक्षा अधिक तरुणांची शिक्षणमित्र म्हणून नेमणूक केली जाणार आहे. हे शिक्षणमित्र शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील दुवाचे काम करणार आहेत. एका गावात विविध आश्रमशाळेतील शिक्षण घेणारे विद्यार्थी राहत असतात. शिक्षण मित्र अशा विविध आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना एकत्रित करून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षकांनी उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक साहित्याचा वापर करून गावातील विद्यार्थ्यांकडून अभ्यास व स्वाध्याय करवून घेणार आहे. शिक्षण मित्राला आदिवासी विकास विभागाकडून दोन हजार रुपये मासिक मानधन व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.