‘रॅन्समवेअर’च्या धास्तीने नंदुरबार जिल्हा प्रशासन, बँकांमध्ये सतर्कता
By Admin | Updated: May 15, 2017 18:18 IST2017-05-15T18:18:28+5:302017-05-15T18:18:28+5:30
शासकीय कार्यालयांसह बँकांमध्येही विशेष दक्षता घेण्यात येत आहे.

‘रॅन्समवेअर’च्या धास्तीने नंदुरबार जिल्हा प्रशासन, बँकांमध्ये सतर्कता
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 15 - सायबर हल्ल्याची चर्चा आणि त्यासंदर्भात फिरणारे मेसेज लक्षात घेता नंदुरबार येथे शासकीय कार्यालयांसह बँकांमध्येही विशेष दक्षता घेण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या सर्व संगणक प्रणालींचे नियंत्रण जिल्हा सूचना व विज्ञान कार्यालयातून करण्यात येत आहे. याशिवाय सर्व संबधित कार्यालयांनाही सूचना देण्यात आल्या. शहरातील निम्मे एटीएमदेखील बंद होते.
सायबर हल्ल्यासंदर्भात सोमवारी आलेल्या बातम्या आणि सोशल मीडियावर फिरणारे मेसेज यामुळे लोकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. आठवडय़ाचा पहिला दिवस ंअसूनही एटीएममध्ये शुकशुकाट दिसून आला. याशिवाय जिल्हा प्रशासनाच्या सर्वच कार्यालयांमध्ये देखील याबाबत सतर्कता बाळगण्यात आली होती.
जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागांच्या संगणक प्रणालींचे नियंत्रण हे जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी कार्यालयाअंतर्गत करण्यात येते. अधिकारी धर्मेद्र जैन यांनी याबाबत सोमवारी सकाळीच सर्व विभाग प्रमुखांना सुचीत करून आवश्यक त्या सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनीदेखील याबाबत जैन यांच्याकडून माहिती जाणून घेतली. सर्व विभागातील संगनकांमधील अॅण्टी व्हायरस दुपार्पयत अपडेट करण्यात आले.याशिवाय विना नावाचा आणि माहितीचा मेल आला असल्यास तो ओपन करू नये. नवीन वेबसाईट देखील ओपन करण्याचे काही दिवस टाळावे. अनोळखी मेल ओपन केला गेल्यास काही अडचणी आल्यास तात्काळ जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा असेही आवाहन धर्मेद्र जैन यांनी केले आहे.
सायबर सेलही सतर्क
जिल्हा पोलीस दलाच्या सायबर सेललाही सतर्क करण्यात आले आहे. अशा प्रकारची तक्रार कुणाकडून आल्यास तात्काळ त्याची माहिती जिल्हा सुचना व विज्ञान कार्यालयात कळविण्याचे सांगण्यात आले आहे.
बँकांचे सॉप्टवेअर अपडेट
स्टेट बँकेचे सॉप्टवेअर वेळोवेळी अपडेट करण्यात येत असल्यामुळे रॅन्समवेअरचा धोका नसल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली. असे असले तरी सर्व संबधितांना काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. स्टेट बँकेचे एटीएम देखील सुरळीत सुरू होते. इतर सर्वच बँकांमधील व्यवहार देखील ऑनलाईन सुरळीत सुरू होते. परंतु आयडीबीआय, बँक ऑफ इंडिया, अॅक्सीस बँक, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँकेचे एटीएम दुपारनंतर बंद दिसून आले. जे एटीएम सुरू होते. त्या ठिकाणी फारशी गर्दी दिसून येत नव्हती.