Vidhan Sabha 2019 : आमदारकीपासून जिल्ह्यातील महिला वंचीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 12:18 IST2019-10-11T12:18:14+5:302019-10-11T12:18:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील एकाही महिलेला आमदार होण्याचा मान मिळालेला नाही. आतार्पयंतच्या निवडणुकीत मात्र 16 महिलांनी उमेदवारी ...

Vidhan Sabha 2019 : आमदारकीपासून जिल्ह्यातील महिला वंचीत
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील एकाही महिलेला आमदार होण्याचा मान मिळालेला नाही. आतार्पयंतच्या निवडणुकीत मात्र 16 महिलांनी उमेदवारी केली आहे. यंदाच्या निवडणुकीत देखील केवळ एकच महिला उमेदवारी करीत आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात पूर्वी पाच जागा होत्या. नंतरच्या पुनर्रचनेत चार जागा झाल्या. आतार्पयतच्या एकुण 11 निवडणुकीत फक्त 16 महिला उमेदवारांनी उमेदवारी केली आहे. त्यापैकी कुणालाही यश आले नाही. पहिल्यांदाच 1972 मधील निवडणुकीत शहादा मतदारसंघातून भुरीबाई सरदार चव्हाण यांनी आरपीआयकडून उमेदवारी केली होती. 1978 मध्ये धडगाव मतदारसंघातून भरुबाई मानसिंग शेमळे यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. 1980 च्या निवडणुकीत नंदुरबार मतदारसंघातून काँग्रेस यू कडून नलीनीबाई तुकाराम गावीत यांनी निवडणूक लढली. त्यावेळी या मतदारसंघात काँग्रेस आय चे उमेदवार व त्यांच्यात सरळ लढत होती.
1985 च्या निवडणुकीत नवापूर मतदारसंघातून निजूबाई गावीत यांनी अपक्ष उमेदवारी केली. 1995 च्या निवडणुकीत दोन उमेदवार होत्या. त्यात नवापूर मतदारसंघातून मिरा किशोर वसावे यांनी दूरदर्शी पार्टीकडून तर शहादा मतदारसंघात कमल निंबा ठाकुर यांनीही अपक्ष उमेदवारी केली. 2004 च्या निवडणुकीत नवापूर मतदारसंघातून दुर्गाबाई पाडवी, सविता रमाकांत गांगुर्डे यांनी अपक्ष तर तळोदा मतदार संघात सावित्री मगन पाडवी यांनीही अपक्ष उमेदवारी केली.
2009 च्या निवडणुकीत नंदुरबार मतदारसंघात भाजपतर्फे सुहासिनी नटावदकर यांनी उमेदवारी केली होती. त्यांना दुस:या क्रमांकांची मते मिळाली होती. शहादा मतदारसंघात प्रमिला केलसिंग पावरा यांनी अपक्ष तर सावित्री मगन पाडवी यांनी राष्ट्रवादी सेनेकडून उमेदवारी केली होती.
2014 च्या निवडणुकीत अक्कलकुवा मतदारसंघातून ममता रवींद्र वळवी यांनी मनसेतर्फे तर शहादा मतदार संघात सावित्री मगन पाडवी यांनी बसपातर्फे उमेदवारी केली होती. शिवाय नवापूर मतदारसंघात शिवसेनेतर्फे ज्योत्सना दिलीप गावीत यांनी तर अपक्ष म्हणून उर्मिला वळवी यांनी उमेदवारी केली होती.
यंदाच्या निवडणुकीत केवळ नंदुरबार मतदारसंघातून वंचीत बहुजन आघाडीतर्फे दीपा वळवी यांनी उमेदवारी केली आहे.
जिल्ह्यातून एकाही महिलेला आमदारकीची संधी मिळाली नसली तरी जिल्ह्यातील कन्येने इतर ठिकाणाहून आमदारकी मिळविली आहे. माजी खासदार माणिकराव गावीत यांच्या कन्या निर्मला गावीत यांनी इगतपूरी मतदारसंघातून दोन वेळा काँग्रेसतर्फे उमेदवारी करून निवडून आल्या आहेत. यंदा त्या शिवसेनेकडून उमेदवारी करीत आहेत. याशिवाय जिल्ह्यातील कन्या डॉ.हिना गावीत या नंदुरबारच्या तर रक्षा खडसे या रावेरच्या विद्यमान खासदार आहेत.