Vidhan sabha 2019 alas vasudev .. | Vidhan sabha 2019 : आला वासुदेव..

Vidhan sabha 2019 : आला वासुदेव..

उठा, उठा.. निवडणूक आली..!

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना पूर्ण पावसाळा पावसाच्या प्रतीक्षेत गेलेल्या मराठवाडय़ातून शनिवारी वासुदेवचे आगमन नंदुरबार रेल्वेस्थानकावर झाले. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास नंदुरबारच्या रेल्वेस्थानकावर पाऊल ठेवताच त्याच्या कानावर पहिला शब्द पडला तो निवडणूक लागली.. आचारसंहिता लागली.. हा शब्द ऐकताच वासुदेव अगदी प्रफुल्लीत झाला. खूप दिवस दुष्काळामुळे मराठवाडा भागात चांगले दान मिळाले नव्हते. दोनवेळचे भागणे कठीण होते. अशा स्थितीत नंदुरबारसारख्या भागात चांगले दान मिळेल या आशेने आलेल्या वासुदेवाला खूप आनंद झाला. निवडणूक लागली म्हणजे आपले सर्व स्वप्ने पूर्ण होतील. गेल्यावेळी प्रमाणेच खूप चांगले दान मिळेल. पिंटय़ाचे शिक्षण पूर्ण होईल, बेबीचे लग्नही करता येईल, हातातील तुटलेला मोबाईल नवा घेता येईल.. असे कितीतरी आशा-अपेक्षांचा भविष्यातील स्वप्नात तो बुडाला आणि रेल्वेस्टेशन त्याने सोडले. थोडेसे पायी चालल्यानंतर पुढे त्याला माणसांचा घोळका दिसला. त्याने त्याचठिकाणी नंदुरबार आणि जिल्ह्यातील पानकाळा आणि राजकीय स्थितीचा कानोसा घेतला. यंदा जिल्ह्यात 100 टक्केपेक्षा जास्त पाऊस झाल्याची माहिती त्याला मिळाली. राजकारणातही एका पक्षाच्या उमेदवारीसाठी खूप जण इच्छुक असल्याची माहिती त्याने काढली. तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांच्या प्रयत्नांचे किस्सेही त्याने ऐकले. हे सर्व ऐकल्यानंतर वासुदेव अजूनच आनंदीत झाला. या वेळी तर निवडणुकीत खूप भरभरुन दान मिळेल या स्वप्नात तो पुन्हा बुडाला. भविष्याचे स्वप्न रंगवत असतानाच दान मागण्यासाठी तयारीचेही नियोजन त्याने सुरू केले. या वेळी कुठल्या देवदेवळात, मंदिरात नव्हे तर हॉटेलातच मुक्काम ठोकायचा त्याने निर्णय घेतला आणि एका चांगल्या हॉटेलचा पत्ता विचारत धुळे रोडकडे त्याने प्रस्थान केले. झपझप पाऊले टाकत असताना अनेक विचार तो करू लागला. पायी जात असतानाच आमदार कार्यालयासमोर खुच्र्यावर काही लोक निद्रीस्त अवस्थेत बसलेले दिसले. वासुदेव चकीत झाला, आमदार कार्यालय आणि कार्यकर्ते झोपलेले.. तो क्षणभर तेथे थांबला. कार्यकत्र्याजवळ गेला पण ते निद्रीस्त असल्याने प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी वासुदेवाने तेथेच आपली फिरकी घेत ‘वासुदेव आला.. वासुदेव आला..’ गीत सुरू केले. हातातील टाळ-चिपळ्यांच्या निनादात त्याने आपल्या शैलीत कार्यकत्र्यानाही जागे करण्यासाठी ‘उठा.. उठा.. निवडणूक आली.. विधानसभेची निवडणूक आली.. आपला आमदार निवडण्याची वेळ आली.. उठा.. उठा..’चा सूर धरला. तेवढय़ात कार्यकर्तेही जागे झाले. वासुदेवाने निवडणुकीकडे लक्ष वेधताच निवडणुकीच्या तारखांवर चर्चा सुरू झाली. वासुदेवाला कार्यकत्र्यानी दान दिले. हे दान घेऊन ‘आला रे आला वासुदेव आला..’  असे म्हणत तो हॉटेलकडे रवाना झाला..
                                                                                                                                                                                                      -वासुदेव

Web Title: Vidhan sabha 2019 alas vasudev ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.