राहूरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंची नंदुरबार कृषी महाविद्यालयास भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 11:01 IST2020-12-19T11:00:53+5:302020-12-19T11:01:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी यांनी आरामदायी जीवनातून बाहेर येऊन अलौकिक कामाचे ध्येय गाठावे, असे ...

राहूरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंची नंदुरबार कृषी महाविद्यालयास भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी यांनी आरामदायी जीवनातून बाहेर येऊन अलौकिक कामाचे ध्येय गाठावे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरु डॉ.अशोक धवन यांनी कृषी महाविद्यालयाच्या भेटीप्रसंगी केले.
यावेळी नंदुरबार येथील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.सात्तापा खरबडे, धुळे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.सी.डी. देवकर उपस्थित होते. महाविद्यालयास आयसीएआर नवी दिल्ली यांच्याकडून रोपवाटिका व्यवस्थापन या प्रकल्पासाठी एकूण ५०.४१ लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला असून, भेटीचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते शेडनेट हाउस व फळपिकांचे रोपेनिर्मितीसाठी मातृवृक्ष लागवड प्रक्षेत्राचे उद्घाटन करण्यात आले.
प्रक्षेत्रावर आवळा, सीताफळ, डाळिंब, पेरू, लिथु, संत्री, चिकू, मोसंबी इत्यादी फळपिकांचे एकूण ५६० मातृवृक्षाची ४.५ हेक्टर क्षेत्रावर रोपेनिर्मितीसाठी लागवड करण्यात आलेली असून, याव्दारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाची रोपे उपलब्ध होणार आहेत. महाविद्यालयातील दोन कोटी लीटर क्षमतेच्या शेततळ्यात पावसाचे पाणी साठवून यामध्ये मत्ससंवर्धनाचे प्रयोग करण्यात येत असून, पिकांना संरक्षित पाणी देण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे. प्रक्षेत्रावरील एकूण लागवडीलायक क्षेत्रापैकी एकूण १३ एकर क्षेत्र लेझार पाइप व सूक्ष्म सिंचन पद्धतीचा उपयोग फळबाग लागवड करण्यात आलेली आहे.
याप्रसंगी डॉ.खरबडे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीविषयक सादरीकरण केले व आवश्यक बाबींसाठी निधीची मागणी केली. सूत्रसंचालन प्रा.राजपूत, तर आभार प्रा.बिराडे यांनी मानले. याप्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.