नंदुरबारात भाजीपाल्याची आवक मंदावलेलीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 12:04 IST2019-05-10T12:04:21+5:302019-05-10T12:04:50+5:30
नंदुरबार : दुष्काळामुळे परिणाम, सर्वसामान्यांचे बजट कोलमडले

नंदुरबारात भाजीपाल्याची आवक मंदावलेलीच
नंदुरबार : नंदुरबारात गेल्या काही दिवसांपासून हिरव्या पालेभाज्यांसह फळभाज्यांची आवकदेखील मंदावली आहे़ त्यामुळे भाजीपाल्याचे भाव तेजीत आहेत़
गेल्या आठवडे बाजाराच्या दिवशी अक्षय तृतीया असल्याने भाजीपाला बाजारदेखील तुरळकच भरलेला होता़ त्यातच भाजीपाल्याची आवकही मंदावली असल्याने भाजीपाला बाजारात आलेल्या नागरिकांचाही चांगलाच हिरमोड झालेला होता़ मार्च महिन्यांपासूनच नंदुरबारात हिरव्या पालेभाज्यांचा तुटवडा निर्माण झालेला होता़ जेमतेम फळभाज्याच बाजारात दिसत होेत्या़ परंतु आता तर, पालेभाज्यांसह गिलके, डोळकी, भेंडी, दुधीसारख्या फळभाज्यांची आवकसुध्दा मंदावली असल्याने भाजीपाला बाजार चांगलाच तेजीत आलेला आहे़ आवक मंदावली असल्याने भाजीपाला दरातही मोठी वाढ झालेली आहे़ भेंडी, गवार, गिलके आदींची ६० ते ७० रुपये किलो दराने विक्री केले जात आहेत़ तर मेथी, पोकळा, पालक आदी पालेभाज्याही ५० रुपये किलो दराने विक्री होत आहे़ तर दुसरीकडे कांदा पिकाची आवक वाढली असल्याने अवघ्या ५ ते १० रुपये किलो दराने कांदा विक्री केला जात आहे़ जुन महिन्यापर्यंत भाजीपाला बाजार तेजीत राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे़