स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात स्वच्छतेचे विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:35 IST2021-09-06T04:35:06+5:302021-09-06T04:35:06+5:30
नंदुरबार जिल्हा मार्च २०१८ मध्ये पायाभूत सर्वेक्षणानुसार हागणदारीमुक्त घोषित झाला आहे. १ सप्टेंबर २०२१ ते १५ ऑगस्ट २०२२ ...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात स्वच्छतेचे विविध उपक्रम
नंदुरबार जिल्हा मार्च २०१८ मध्ये पायाभूत सर्वेक्षणानुसार हागणदारीमुक्त घोषित झाला आहे. १ सप्टेंबर २०२१ ते १५ ऑगस्ट २०२२ यादरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमांमध्ये गाव हागणदारीमुक्त घोषित करणे या उपक्रमात गावचा हागणदारीमुक्त ग्रामपंचायतींचा दर्जा कायम ठेवून त्यात सातत्य राखण्याच्या दृष्टीने हागणदारीमुक्त अधिक ओडीएफ प्लस हा उपक्रम राबवून १५ ऑगस्टअखेर जिल्ह्यातील ५९५ ग्रामपंचायती ९४५ गावे टप्प्याटप्प्याने हागणदारीमुक्त अधिक घोषित करावयाच्या आहेत. तसेच शाश्वत स्वच्छतेसाठी विविध समाज माध्यमांद्वारे जाणीव जागृती करण्यात येणार आहे.
१५ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्याच्या विविध ग्रामपंचायतींत स्वच्छतेचा संदेश देणारा चित्ररथ यात्रा काढण्यात येणार आहे. स्वच्छतेविषयी ग्रामस्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या स्वच्छग्रहींना गौरविण्यात येणार आहे. २५ सप्टेंबर रोजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित स्वच्छतेविषयक चर्चासत्रात जिल्ह्यातील काही सरपंचांना सहभागी होता येणार आहे. दि. २ ऑक्टोबर रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात येणार आहे. स्वच्छता संवाद या उपक्रमांतर्गत वर्षभरात जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या समवेत स्वच्छता संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
१९ नोव्हेंबर या जागतिक शौचालय दिनानिमित्त शाश्वत स्वच्छता या विषयावर दृक-श्राव्य माध्यमाद्वारे गावातील पदाधिकारी, ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांसाठी चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. २ ऑक्टोबर रोजी संकल्प शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, ऑनलाइन प्रश्नमंजूषा हे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी दिली.