समाजसेवेचा वारसा जपणाऱ्या तिलालीच्या सरपंच वंदना सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:21 IST2021-07-21T04:21:25+5:302021-07-21T04:21:25+5:30
वंदनाताई यांना माहेरूनच राजकारणाचा वारसा मिळाला आहे. त्यांचे वडील लामकाणीचे माजी उपसरपंच होते. पती डॉ. सी. पी. सावंत हेदेखील ...

समाजसेवेचा वारसा जपणाऱ्या तिलालीच्या सरपंच वंदना सावंत
वंदनाताई यांना माहेरूनच राजकारणाचा वारसा मिळाला आहे. त्यांचे वडील लामकाणीचे माजी उपसरपंच होते. पती डॉ. सी. पी. सावंत हेदेखील यापूर्वी तिलालीचे ग्रामपंचायत सदस्य होते. शालेय शिक्षण समिती, तंटामुक्त समिती यांसह गावातील विविध समित्यांवर काम करून डॉ. सी. पी. सावंत यांनी आपले काम सुरू ठेवले. नोकरीनिमित्ताने ते नंदुरबारात स्थायिक असले तरी त्यांनी आपल्या गावाशी नाळ तोडली नाही. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी पीएच. डी. मिळविली. महाविद्यालय तसेच विद्यापीठाच्या विविध समित्यांवर तेे पदाधिकारी म्हणून राहिले. एनमुक्टोसारख्या संघटनेचे जिल्हाध्यक्षपद यशस्वीरीत्या सांभाळले. आता ते अक्कलकुवा विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी आज पीएच.डी. झाले असून अनेक उच्चपदावर कार्यरत आहेत. चतुर सर व वंदनाताई यांनी नेहमीच समाजसेवेला प्राधान्य दिले आहे. गावातील कुठल्याही व्यक्तीचे कुठलेही काम राहिले आणि तो व्यक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचला तर त्याला ते कधीच नाराज करणार नाही. काम होत नसेल तर किमान दिलासा व धीर तरी देतील. गावातील गणेशोत्सव असो, कानुमाता उत्सव असो किंवा इतर कुठलाही धार्मिक कार्यक्रम असतो; त्यात या दाम्पत्याचे सक्रिय योगदान असतेच. गावातील कानुबाई मंदिरातील मूर्तीसाठी त्यांनी ४१ हजार रुपयांची देणगी दिली. सदस्य व सरपंचपदीदेखील बिनविरोध विराजमान झाल्या. हे शक्य झाले ते केवळ त्यांच्या सामाजिक दातृत्व व कर्तृत्वामुळेच. यासाठी माजी आमदार चंद्रकांतजी रघुवंशी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभैय्या रघुवंशी, सामाजिक कार्यकर्ते तथा मार्गदर्शक संतोषआबा पाटील यांचे मोठे सहकार्य व योगदान राहिले.
केवळ पद घेऊन ते मिरवून घेणे सावंत दाम्पत्याला कधीही आवडले नाही. त्यामुळे सरपंचपद मिळताच आधी त्यांनी गावात कुठल्या कामांची आवश्यकता आहे; कुठल्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे यासाठी त्यांनी गावकऱ्यांची बैठक घेऊन ते समजून घेतले. त्यानुसार कामाला सुरुवात केली. याच काळात कोरोनाची साथ जोमात होती. त्यामुळे या साथीवर नियंत्रण आणणे आणि कमीत कमी त्याचा गावात फैलाव होणे यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. स्वखर्चाने संपूर्ण गावात त्यांनी फवारणी केली. स्वखर्चानेच प्रत्येक कुटुंबाला मास्क, सॅनिटायझर वाटप केले. गावात विनाकारण फिरणे, गर्दी करून बसणे, सार्वजनिक कार्यक्रम यांवर निर्बंध घालून कडक उपाययोजना दंडदेखील केले. त्यामुळे कोरोनाच्या साथीचा गावात फारसा शिरकाव झाला नाही. ग्रामस्थांची साथ आणि सरपंच यांचे योग्य नियोजन यामुळे हे सर्व शक्य झाल्याचे ग्रामस्थ अभिमानाने सांगतात. गावात सध्या भूमिगत गटारींच्या कामांना सुरुवात झाली आहे. लवकरच अंतर्गत रस्तेकाम, पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन, महिला शौचालय यांसह गाव हगणदारीमुक्त करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. दिव्यांगांसाठीचा त्यांचा हक्काचा निधी त्यांना मिळावा यासाठी दिव्यांगांना चेकद्वारे त्यांच्या हक्काची रक्कम देणारी तिलाली ही नंदुरबार तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली. याशिवाय गावातील पात्र लाभार्थी व्यक्तींना निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी स्वत: सरपंच वंदनाताई या प्रयत्नशील असतात. काहींना योजनेची माहिती नाही; परंतु पात्र आहेत अशा अनेकांचे कागदपत्र तयार करून त्यांची फाईल करून प्रकरण संबंधित कार्यालयात जमा करण्यास त्यांचे प्राधान्य असते.
या सर्व कामांमध्ये त्यांचे पुत्र चि. कल्पेश याचादेखील सिंहाचा वाटा आहे. आपले शिक्षण पूर्ण करताना तोदेखील ग्रामविकासात आता सक्रिय झाला आहे. आईसोबत तो ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी तत्पर असतो. गावातील युवकांचे संघटन करून त्या माध्यमातून विविध विधायक कामे सुरू आहेत. सुरू असलेल्या गावातील विकासकामांवर देखील तो लक्ष देऊन असतो. या माध्यमातून तो सामाजिक कार्यात सक्रिय झाला आहे.
गावविकासासंदर्भात बोलताना वंदनाताई सांगतात, माहेर आणि सासरकडून समाजसेवेचा वारसा मिळाला आहे. पती गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रांत सक्रिय आहेत. त्यांच्या समाजसेवेची तळमळ मी पाहत असते. त्यांच्याकडून मला कामांची प्रेरणा मिळत असून माजी आमदार भैय्यासाहेब चंद्रकांतजी रघुवंशी, रामभैय्या रघुवंशी व संतोष आबा पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे. गावाची सेवा करण्याची मिळालेल्या या संधीचे आपण नक्कीच सोने करणार, असेही सरपंच वंदनाताई यांनी सांगितले.
कामांचा धडाकेबाज प्रारंभ...
गावातील विविध विकासकामांचा धडाकेबाज प्रारंभ करण्यात आला आहे. ४४ लाख रुपये खर्चाच्या रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन माजी आमदार चंद्रकांतजी रघुवंशी, जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष रामभैय्या रघुवंशी, सामाजिक कार्यकर्ते संतोषआबा पाटील, सरपंच वंदनाताई सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.
ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी विजेचे पोल बसविण्यात येणार असून जास्त क्षमतेचे विद्युत ट्रान्सफार्मरही लवकरच मंजूर करून बसविले जाणार आहे.
आरोग्य व स्वच्छतेवर भर
ग्रामस्थांच्या आरोग्य व स्वच्छतेवर सर्वाधिक भर देण्याचा प्रयत्न सरपंच वंदना सावंत यांचा आहे. त्याच अनुषंगाने गावात महिलांचे आरोग्य व त्यांच्या समस्या यावर त्या भर देत आहेत. शुद्ध पाण्यासाठी १० लाख रुपये खर्च करून आरओ प्लांट बसविण्यात येत आहे. १० लाख रुपये खर्च करून महिला शौचालय बांधले जात आहे. तेथपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता तयार करण्यात येत आहे. गावात जागोजागी कचराकुंड्या ठेवल्या जाणार आहेत. बंदिस्त गटारी तयार करण्यात येत असून धोबीघाटाचाही प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे सरपंच वंदनाताई सावंत यांनी सांगितले. आपण स्वत: महिला असल्याने महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यावर आपला सर्वाधिक भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.