प्रकाशा येथे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:22 IST2021-06-03T04:22:16+5:302021-06-03T04:22:16+5:30
प्रकाशा गावाची लोकसंख्या जास्त आहे. यामध्ये ४५ वयाचा वरती तीन हजार ३१ लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करावयाचे आहे. त्यापैकी ...

प्रकाशा येथे लसीकरण
प्रकाशा गावाची लोकसंख्या जास्त आहे. यामध्ये ४५ वयाचा वरती तीन हजार ३१ लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करावयाचे आहे. त्यापैकी पहिला डोस १३२० लोकांनी घेतला, असून, दुसरा डोस ३९६ लोकांनी घेतला आहे. म्हणजेच ४३.७४ टक्के लसीकरण झालेले आहे. लसीकरण वाढविण्यासंदर्भात केंद्रप्रमुख, प्राथमिक शाळेचे शिक्षक, माध्यमिक शाळेचे शिक्षक, आरोग्यसेवक, आशा वर्कर, ग्रामपंचायतीचे सदस्य व कर्मचारी, तथा महसूल विभाग यांचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत प्रकाशा गावात एक शिबिर झाले असून, प्राथमिक आरोग्य केंद्राची १४ शिबिरे झाली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक बावस्कर यांनी दिली.
१ जून रोजी दगडी शाळा प्रकाशा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन सरपंच सुदाम ठाकरे यांनी केले. दिवसभरात ४३ लोकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. यासाठी आरोग्य विभागाचे सोनार, एस. डी. आगळे, आरोग्यसेविका संगीता पाटील, विद्या चौधरी, करुणा खैरनार, गटप्रवर्तक ममता पाटील, आशा वर्कर सविता पाटील, अलका चौधरी, सारिका बारीकराव, लिलाबाई पिंपळे यांच्यासोबत प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामलाल पारधी, रवींद्र पाटील, ए. के. पाटील, भटू सामुद्रे, दर्पण भामरे, महेंद्र शिंपी, नरेंद्र गुरव, मनोज पाटील, आदी शिक्षकांनी या शिबिराप्रसंगी जनजागृती करीत लसीकरणासाठी लोकांना आणले.
लोकप्रतिनिधींकडून जनजागृती आवश्यक
प्रकाशा परिसरामध्ये गेल्या एक ते दीड महिन्यापासून आरोग्यसेवक, आशा वर्कर, शिक्षक, ग्रामपंचायत विभाग, महसूल विभाग, आदी, सर्व जनजागृती करीत आहेत. जास्तीत जास्त लोकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करावे यासाठी जनजागृती करण्यात येत असून, गावातील लोकांना आरोग्य केंद्रावर जाणे लांब पडते म्हणून दगडी शाळेमध्ये शिबिराचे आयोजन केले होते.
शिबिराचे आयोजन जर गावाच्या इतर गल्लीत केलं तर नक्कीच संख्या वाढेल यात दुमत नाही. मात्र, लोकप्रतिनिधी आमदार, खासदार यांनीदेखील गावांमध्ये विविध उपक्रम राबवीत लसीकरणासाठी जोर धरला पाहिजे असे सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे. कारण काही गट अजूनही लसीकरणापासून लांब आहेत. त्यांच्या जनजागृती होणे गरजेचे आहे.
सुज्ञ नागरिक प्रकाशा
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण सुरू आहे. मात्र, ज्यांच्याकडे वाहन नाही त्यांना एवढ्या लांब जाणं परवडत नाही म्हणून दररोज गावातील प्रत्येक गल्लीमध्ये एक-एक शिबिर लावण्यात यावे जेणेकरून यांची संख्या वाढेल.
शिबिराचे आयोजन गावातील सर्वच गल्लीमध्ये एक दिवस व्हावे. जेणेकरून लोकांना ते सुलभ होईल.