शहादा तालुक्यात लसीकरण जनजागृती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:37 IST2021-06-09T04:37:56+5:302021-06-09T04:37:56+5:30

कोरोना लसीबाबत नागरिकांमध्ये असलेली भीती व गैरसमज दूर करण्यासाठी प्रशासनासह सेवाभावी संस्थांतर्फे जनजागृती करण्यात येत आहे. विचारधारा फाउंडेशन व ...

Vaccination Awareness Campaign in Shahada Taluka | शहादा तालुक्यात लसीकरण जनजागृती अभियान

शहादा तालुक्यात लसीकरण जनजागृती अभियान

कोरोना लसीबाबत नागरिकांमध्ये असलेली भीती व गैरसमज दूर करण्यासाठी प्रशासनासह सेवाभावी संस्थांतर्फे जनजागृती करण्यात येत आहे. विचारधारा फाउंडेशन व जनसेवा मंडळातर्फे शहादा तालुक्यातील आसूस, सोनवल त.ह., नवापाडा, कवळीथ, होळगुजरी, पाडळदा खुर्द, भागापूर, जवखेडा, बडवी, गोगापूर, दामळदा, भोरटेक, चिखली, ओझर्टा, चांदसैली, गोदीपूर, न्यू गोदीपूर, ब्राह्मणपुरी, सुलवाडा, सुलतानपूर, नवलपूर, आवगे, जुनवणे, टेंभली, सावखेडा आदी गावांमध्ये कोरोना लसीकरण जनजागृती अभियान राबविण्यात आले. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गावागावांत घरोघरी जाऊन लोकांशी संवाद साधून कोरोनापासून घ्यावयाची काळजी व उपाय, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या दृष्टीने लसीचे महत्त्व आदींबाबत स्थानिक बोलीभाषेतून माहिती देऊन लस टोचून घेण्याबाबत आवाहन केले. पोस्टर प्रदर्शन व गीतांच्या माध्यमातूनही प्रबोधन करण्यात आले. अभियानादरम्यान स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून आठ ठिकाणी लसीकरण शिबिरांचे आयोजनही करण्यात आले. आसूस, टुकी, कवळीथ, सोनवल त.ह., सुलवाडा, जवखेडा, गोदीपूर व चांदसैली आदी लसीकरण केंद्रांमध्ये सुमारे ४१७ नागरिकांनी स्वेच्छेने लसीकरण करून घेतले. शिबिरादरम्यान अपंग व वयोवृद्ध नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत आणणे व घरी पोहोचवणे तसेच शेजारील गावांमधील नागरिकांना लसीकरण केंद्रात आणून लसीकरण झाल्यावर त्यांना घरी पोहोचवणे आदी कामेही अभियान पथकाने केली. अभियानासाठी प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, जनसेवा मंडळ नंदुरबारचे संचालक गॉडफ्रे डिलिमा, वाघर्डे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. डी. निकुंबे, डॉ. विनायक गिरासे, सुलवाडाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रंजना लेंडे, डॉ. ताई जाधव, आरोग्य कर्मचारी, स्थानिक ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, जि. प. शाळांचे शिक्षक, पोलीस पाटील, आशासेविका, अंगणवाडीसेविका व मदतनीस यांचे सहकार्य लाभले. विचारधारा फाऊंडेशनचे संचालक तात्याजी पवार, सदस्य नलिनी पवार, युद्ध ठाकरे, विलास अहिरे, शांतीलाल पवार, मधुकर पवार, विनोद वाघ, नारायण पवार, दिनेश ठाकरे, संतोष जाधव, मणिलाल सूर्यवंशी, विनोद वळवी, गोपाल ठाकरे, लहू सनेर व सुक्राम पवार आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन अभियान यशस्वी केले. ब्राह्मणपुरी येथे अभियानाचा समारोप करण्यात आला.

Web Title: Vaccination Awareness Campaign in Shahada Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.