जिल्ह्यातील सव्वालाख जनावरांचे लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST2021-06-10T04:21:15+5:302021-06-10T04:21:15+5:30
नंदुरबार : पावसाळ्यात गुरांना विविध आजारांची लागण होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर गुरांचे मान्सूनपूर्व लसीकरण शिबिर सुरू करण्यात आले ...

जिल्ह्यातील सव्वालाख जनावरांचे लसीकरण सुरू
नंदुरबार : पावसाळ्यात गुरांना विविध आजारांची लागण होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर गुरांचे मान्सूनपूर्व लसीकरण शिबिर सुरू करण्यात आले आहे. यंदा कोरोनामुळे लसीकरण लांबण्याची शक्यता होती. परंतु नंदुरबार जिल्ह्यात मात्र गेल्या महिन्यापासून हे लसीकरण सुरू झाले आहे. जिल्ह्यातील एक लाख २१ हजार पाळीव गुरे, कोंबड्या, शेळ्या-मेंढ्या यांना ही लस दिली जात आहे.
सातपुड्याच्या दुर्गम भागाचा समावेश असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात बहुतांश आदिवासी शेतकरी जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करतात. बिगर आदिवासी शेतकरीही शेतीसोबत पशुपालनाचा छोट्या प्रमाणावर व्यवसाय करतात. यातून आर्थिक लाभ होत असल्याने ते याकडे लक्षही देतात. दरम्यान, पावसाळ्यात उगवणारा हिरवा चारा पाळीव गुरांच्या आजारपणाचेही कारण ठरतो. सोबत कीटकजन्य आजारही शक्य असल्याने जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून दरवर्षी मे व जून महिन्यात मान्सूनपूर्व लसीकरण करण्यात येते. गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.
कोणकोणत्या दिल्या जातात लस?
जिल्ह्यातील पाळीव गुरांना घटसर्प, फऱ्या या लसी दिल्या जातात. यंदा चार लाख गाई, म्हशी, बैल यांना या लसी देण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील पाळीव शेळ्या व मेंढ्यांना ३ लाख १५ हजार आंत्रविशार आजारावर लसी देण्यात येणार आहेत. गेल्या २० मेपासून हे लसीकरण सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.
जिल्ह्यातील तीन लाख ११ हजार ८० शेळ्या, चार लाख ९० हजार १९० कुक्कुटपक्षी, ३५ हजार ४५१ मेंढ्या, ३ लाख २० हजार ६८ गाई आणि ७२ हजार ९२९ म्हशींना ही लस दिली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने पशुधन विकास अधिकाऱ्यांचा समावेश असलेली १२ पथके, तर राज्य शासन पशुसंवर्धन विभागाने सहा पथके तैनात केली आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेेचे एकूण ८५, तर राज्य शासनाचे १९ असे १०४ दवाखाने आहेत. या दवाखान्यांमध्ये सध्या रिक्त पदांमुळे कामावर परिणाम होत आहे. यातून लसीकरण लांबण्याची शक्यता होती. परंतु मे मध्यापासून कामाला सुुरुवात झाल्याने लसीकरण आटोपण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. उमेश पाटील यांनी दिली आहे.