रिक्त पदांमुळे कामांना अडथळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:20 IST2021-06-29T04:20:56+5:302021-06-29T04:20:56+5:30
याबाबत असे की, पाटबंधारे उपविभाग शहादा अंतर्गत सहा शाखा असून, प्रकाशा येथे या विभागाचे मुख्यालय आहे. तर शहादा, सुसरी, ...

रिक्त पदांमुळे कामांना अडथळे
याबाबत असे की, पाटबंधारे उपविभाग शहादा अंतर्गत सहा शाखा असून, प्रकाशा येथे या विभागाचे मुख्यालय आहे. तर शहादा, सुसरी, लोंढरे, तळोदा एक, तळोदा दोन येथे ही कार्यालय आहे. या सहा कार्यालयात एकूण ८३ पदे मंजूर असून, त्यापैकी आजच्या स्थितीला फक्त ११ कर्मचारी कार्यरत आहेत,
तर ७२ तर पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामांना अनंत अडचणी येत आहे. शिवाय या विभागात उपविभागीय अधिकारी नसल्याने जे आहेत त्यांचा पगार काढण्यासाठी उपविभागीय अधिकारीच नसल्याने त्यांचे पगार रखडले आहेत. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे झाले असून, रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, अशी मागणी केली जात आहे.
या रिक्त पदांमुळे लाभदायी क्षेत्रातील शेतकऱ्यांना दाखले मिळत नाहीत. सही करणारे पद रिक्त आहेत म्हणून शेतकऱ्यांची फिरफिर होत आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. आता तर पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. म्हणून सुसरी व लोंढे (ता.शहादा) येथील धरणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असे असताना या विभागात उपविभागीय अधिकाऱ्यासह ७२ पदे रिक्त आहेत.
जे ११ कर्मचारी आहेत, त्यांचा पगार काढण्यासाठीदेखील अडचण येत आहेत. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ या विभागाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
खालील पदे रिक्त
महत्त्व पूर्ण उपविभागीय अधिकारी एक पद मंजूर आहे. मात्र, तेही रिक्त आहे. कार्यकारी अभियंता श्रेणी दोनचे चार पदे मंजूर आहेत. ही चारही पदे रिक्त आहेत. सहायक स्थापत्य अभियंता चार पदे मंजूर असून, ही चार पदे रिक्त आहेत. तसेच अनुरेखक एक पद मंजूर असून तेही रिक्त आहे. वरिष्ठ लिपिक एक हे पदही रिक्त आहे. तसेच कनिष्ठ लिपिक तीन पदे, दप्तर कारकून पाच पदे असून, चार रिक्त आहेत.
कालवा निरीक्षक १६ पदे आहेत. त्यापैकी चार पदे कार्यरत आहेत तर १२ पदे रिक्त आहेत. मोजणीदार चार पदे मंजूर असूनही चारही पदे रिक्त आहेत. वाहनचालक एक पद मंजूर असून, तेही रिक्त आहे. संदेशक पाच पदे रिक्त, शिपाई पाच पदे रिक्त, चौकीदार पाच पैकी एक कार्यरत आहे, तर चार रिक्त आहेत.
कालवा चौकीदार १४ पदे मंजूर असून, त्यापैकी एक कार्यरत आहे, तर १३ पद रिक्त आहेत. कालवा टपाली १४ मंजूर असून, एक कार्यरत आहे व उर्वरित पदे रिक्त आहेत, अशी अवस्था पाटबंधारे उपविभागाची झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या विभागाकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
प्रकाशा येथील कार्यालयात माहिती घेण्यासाठी गेले असता त्यांनी सांगितले की, दोन-तीन महिन्यांपासून आमचा पगार नाही. शिवाय कामासाठी धुळे किंवा इतर ठिकाणी गेले असतात त्याचाही भत्ता मिळत नाहीत, अशी माहिती देण्यात आलेली आहे.