वस्तू वाहतुकीसाठी गाढवांचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 13:01 IST2020-08-03T13:00:54+5:302020-08-03T13:01:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : तळोदा तालुक्यातील पाल्हाबार, कुवलीडाबर, व चिडमाळ येथील ग्रामस्थांना रापापूरपासून रस्ता नसल्याने रस्त्याअभावी अडचणीना तोंड ...

वस्तू वाहतुकीसाठी गाढवांचा वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : तळोदा तालुक्यातील पाल्हाबार, कुवलीडाबर, व चिडमाळ येथील ग्रामस्थांना रापापूरपासून रस्ता नसल्याने रस्त्याअभावी अडचणीना तोंड द्यावे लागत असून, रस्त्याअभावी गावांना विकासापासून वंचित रहावे लागले आहे.
या गावकऱ्यांना रस्ता नसल्याने घर बांधकामासाठी लागणारे साहित्य सिमेंट, रेती, खडी तसेच शेतकऱ्यांना खत, बी-बियाणेसह इतर साहित्य नेण्या-आणण्यासाठी गाढवाचा आधार घ्यावा लागतो व वेळेवर गाढव मिळाले नसल्यास खडकाळ घाटमार्गाने पायपीट करून नऊ ते पंधरा किलोमीटर डोक्यावरच जीवनावश्यक वस्तूंचे ओझे घेत अंतर मोजावे लागत आहे.
आजारी रूग्णांना रूग्णालयात औषधोपचारासाठी किंवा गर्भवती महिलांना बाळंतपणासाठी रूग्णालयात नेण्यासाठी लाकडी दाड्यांना झोळी बांधून त्यात रूग्ण अथवा गर्भवती महिलांना झोपवून ती झोळी घरातील दोन ते चार सदस्य खांद्यावर उचलून पायवाटेने त्यांना रापापूरपर्यंत आणतात. तेथून पुढे तळोदा रूग्णालय गाठावे लागते
तळोदा येथून रापापूरपर्यंत रस्ता असून, रापापूरपासून पुढे नऊ ते दहा किलोमीटर पाल्हाबार, पाल्हाबार ते कुवलीडाबर हे अडीच ते तीन किलो मीटर, कुवलीडाबर ते चिडमाळ तीन किलो मीटर असा घाट वळणचा खडकाळ भाग रस्ता नसल्याने पायवाटेच्या मार्गाने घर बांधकामासाठी लागणारे सिमेंट, खडी, रेती, शेतकºयांचे बी-बियाणे, खते यासह जीवनावश्यक वस्तूंचे ओझे रापापूरहुन गाढवावर आणावे लागते व वेळेवर गाढव उपलब्ध झाले नाहीतर स्वत:च हे जीवनावश्यक ओझे डोक्यावर घेऊन घराचे अंतर कापावे लागते.
प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी मंजूर निधी हा घर बांधकाम साहित्य घरापर्यंत आण्यातच खर्च होत असून, घराचे बांधकामही पूर्ण होत नाही. पाल्हाबार, कुवलीडाबर, चिडमाळ येथे रस्ता नसल्याने वाहने जाऊ शकत नाही त्यामुळे या गावांना विकासापासून वंचित रहावे लागले आहे. रस्ताअभावी वाहन जाऊ शकत नसल्याने पाल्हाबार, कुवलीडाबर, चिडमाळ येथे हातपंपदेखील टाकता आले नाही. हातपंपाअभावी पाण्याची सोय होऊ शकली नसल्यामुळे या गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करीत नदीच्या किनाºयावर असलेल्या विहिरीतून पाणी आणावे लागत आहे. पावसाळ्यात जर नद्यांना पाणी आले की मग नद्याचे पाणी कमी होण्याची वाट पाहत बसावे लागते. गुरांनादेखील याच ठिकाणी पाणी पाजण्यासाठी आणावे लागत असल्याचे सांगण्यात आले.
रस्ता नसल्याने दळण वळणाचे साधन उपलब्ध होवू शकत नाही. रस्त्याअभावी हातपंप, बोरवेल टाकू शकत नाही. आजारी व्यक्ती व गरोदर मातांना तत्काळ दावाखान्यात दाखल करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच प्रधानमंत्री घरकुल योजना गरीब लोकांनासाठी असून, घरकुलासाठी देण्यात येणारा पैसा हा वाहतुकीतच खर्च होत असल्याने या दुर्गम भागातील लोक कसे घर पूर्ण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण या भागात रस्त्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून या दुर्गम भागातील समस्या तत्काळ सोडविण्याची मागणी होत आहे.
- गणेश पाडवी, पाल्हाबार