जिल्ह्यात ‘मिलीडुबिया’द्वारे व्यावसायिक शेतीचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 20:29 IST2019-04-01T20:28:39+5:302019-04-01T20:29:05+5:30
आंतरपिक : दुष्काळी तालुक्यात फुलतंय नंदनवन

जिल्ह्यात ‘मिलीडुबिया’द्वारे व्यावसायिक शेतीचा प्रयोग
ब्राह्मणपुरी : वारंवार सतावणारा दुष्काळामुळे शेतकरी वेगळ्या वाटा शोधून उन्नत शेतीकडे वळत आहेत़ यात ब्राह्मणपुरी ता़ शहादा येथील शेतकऱ्याने मिलीडुबिया नामक झाडांची लागवड सुरु केली असून विविध उत्पादनांसाठी कच्चा माल म्हणून या झाडांना मागणी आहे़ त्यांचा हा कित्ता इतर शेतकरी गिरवत असून यातून व्यावसायिक शेतीवर भर देण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे़
शहादा तालुक्यातील जवखेडा येथील शेतकरी हिरालाल ओंकार पाटील यांनी १४ एकर क्षेत्रात ५ हजार मिलिडूबिया झाडांची लागवड केली आहे़ चार वर्ष असा दीर्घवेळ घेणाऱ्या मिलीडूबियाच्या झाडांची ३० फूटांपर्यंत वाढ होऊ शकते़ कागद आणि प्लायवूडच्या निर्मितीसाठी मिलीडुबियाच्या लाकडाचा सर्वाधिक उपयोग होतो़ प्रामुख्याने कर्नाटक आणि केरळ राज्यात लागवड होणाºया झाडांची नंदुरबार जिल्ह्यात लागवड करुन त्यापासून उत्पादन घेण्याचा हा पहिलाच प्रयोग असून तो बºयापैकी यशस्वी झाल्याचे जवखेडा शिवारातील हिरालाल पाटील यांच्या शेतात दिसून येत आहे़
दीर्घकालीन पिक असल्याने शेतकरी हिरालाल पाटील यांनी झाडांमध्ये आंतरपिकांची लागवड करुन उत्पादन कायम ठेवले आहे़ यातून त्यांना एकरी किमान ४० लाख रुपयांचे उत्पन्न येण्याचा अंदाज आहे़ आंतरपिक म्हणून त्यांनी खरबूज आणि बीट या बहुपयोगी पिकांचा आधार घेतला आहे़ जिल्ह्यातील मिलीडुबिया लागवडीचा हा पहिलाच प्रयोग असल्याने शेतकरी वेळावेळी भेट देत माहिती घेत आहेत़ मिलीडुबियाच्या लागवडीबाबत माहिती देताना हिरालाल पाटील यांनी सांगितले की, एका कार्यशाळेत पहिल्यांदा मिलीडुबिया लागवडीची माहिती मिळाली होती़ यानंतर कर्नाटक राज्यातून प्रत्येकी एक फूट उंचीचे ५ हजार रोपे मागवून त्यांची लागवड केली होती़ आजअखेरीस रोपांचे वय हे १३ महिने झाली असून त्यांची उंची ३० फूटांपर्यंत पोहोचली आहे़