संडे स्पेशल मुलाखत- खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश जिल्ह्यासाठी फलदायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 12:53 IST2020-11-01T12:53:18+5:302020-11-01T12:53:26+5:30
राजकारण आणि पक्षापलीकडे एकनाथ खडसे हे कुटूंबातील वेगळे व्यक्तीमत्व असून त्यांनी सर्वांना एका माळेत बांधून ठेवले आहे. -जगदीश पटेल, खेडदिगर.

संडे स्पेशल मुलाखत- खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश जिल्ह्यासाठी फलदायी
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे नात्याने आपले व्याही आहेत. त्यांचे राजकारण व राजकीय दिशा हा त्यांचा स्वतंत्र विषय आहे. आमच्याकडे आल्यानंतर व आम्ही देखील त्यांच्याशी कौटूंबिक नाते जिव्हाळ्यातूनच संपर्कात असतो. त्यांनी सद्या भाजपमधून राष्ट्रवादी कॅांग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यासंदर्भात महाराष्ट्रभर वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातही तशी चर्चा आहे. या चर्चेशी आपला फारसा संबध नसला तरी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे आणि राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्ष सद्या राज्यात सत्तेत असल्याने खडसेंच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील त्यांनी सुरू केलेले अनेक प्रकल्पांना चालना मिळू शकते. ते यासाठी निश्चित लक्ष घालतील असा आपल्याला विश्वास आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रवेश जिल्ह्यासाठी निश्चीतच फलदायी ठरेल याची आपल्याला खात्री आहे.
विकासाचा पाठपुरावा...
एकनाथ खडसे यांच्या या जिल्ह्याशी सुरुवातीपासून ऋणानुबंध आहे. नातेनंतर जुळले. त्यामुळे त्यांनी या जिल्ह्याच्या विकास कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. अनेकांचा वैयक्तीक अडचणीच्या वेळीही ते मदतीला धावून आले आहेत. पाटबंधारे मंत्री असतांना त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन अनेक वर्षांपासून रखडलेेले प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजचे काम सुरू केले. नव्हेतर त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करून ते पुर्णही केले. आता राज्यात राष्ट्रवादीची सत्ता असल्याने ते निश्चितच उपसा योजना सुरू करण्यासाठी पाठपुरावा करतील.
कन्या रक्षा खडसे या भाजपतर्फे खासदार आहेत त्यांचाही जिल्ह्यातील कामांसाठी पाठपुरावा असतो. पक्ष कुठलाही असो नाते संबधात मात्र कुठलाही तडा जाणार नाही. कारण कुटूंबातील खडसे हे एक वेगळे व्यक्तीमत्व असून सर्वांवर जीवापार प्रेम करतात.
खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने जिल्ह्यातील कार्यकर्तेही त्यांच्यासोबत पक्षांतर करतील का?
एकनाथ खडसे यांचा राजकीय भुमिकेविषयी बोलण्याचा आपला काहीही अधिकार नाही. त्यांना भेटण्यासाठी जिल्ह्यातील अनेक नेते, कार्यकर्ते येथे येतात. त्यांच्यात काय चर्चा होते याबाबत आपण काहीही हस्तक्षेप करीत नाही. त्यांना मानणारे जिल्ह्यात कार्यकर्ते मोठे आहेत. आपलेही नातेसंबध जिल्ह्यात मोठे आहेत. पण कार्यकर्ते आणि नातेवाईकांनी कुठल्या पक्षात प्रवेश करावा हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. त्यामुळे कोण कुठल्या पक्षात जातील किंवा कोण पक्षांतर करेल हा प्रश्न आपल्यासाठी नाही. त्यामुळे त्याबाबत मी फारसे बोलू शकत नाही.