जयनगरसह परिसरात अवकाळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST2021-01-10T04:24:04+5:302021-01-10T04:24:04+5:30
शुक्रवारी रात्री रात्रभर रिमझिम पाऊस झाल्याने ज्वारीसह केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच गहू, हरभरा या पिकांवरही ...

जयनगरसह परिसरात अवकाळी पाऊस
शुक्रवारी रात्री रात्रभर रिमझिम पाऊस झाल्याने ज्वारीसह केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच गहू, हरभरा या पिकांवरही पुन्हा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाल्याने तेव्हाही गहू, हरभरा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी महागडी फवारणी करूनही पिके पूर्वपदावर आणली होती. मात्र आता परत ढगाळ वातावरणासोबत अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या दीड महिन्यापासून दिल्ली येथे शेतकरी आंदोलन चालू असून, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची केळीबाग तयार झाली आहे त्या शेतकऱ्यांचा बराचसा माल व्यापाऱ्यांनी खरेदीस नकार दिल्यामुळे परिपक्व झालेले घड रात्रभरच्या पावसामुळे गळून पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला गेला असून, शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.
अवकाळी पावसामुळे रब्बी पिकेही वाया गेली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी हिवाळ्याच्या सुरुवातीलाच गहू पेरणी केली आहे त्या गव्हाला फुटकी पडण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. जयनगरसह अनेक शेतकरी सध्या कांदा लागवड करीत असून, ढगाळ वातावरणामुळे व अवकाळी पावसामुळे कांदा पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे. कोठली गावात तीन-चार शेतकऱ्यांनी कांदा काढणी केली असून अवकाळी पावसामुळे कांदा खराब झाला आहे. नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जयनगरसह परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.