आश्रमशाळांतील २८ हजार विद्यार्थ्यांसाठी ‘अनलॉक लर्निंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:17 IST2020-06-21T12:16:57+5:302020-06-21T12:17:04+5:30

हंसराज महाले । लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : आॅनलाईन कनेक्टीव्हीटीच्या समस्येवर मात करीत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाने ‘अनलॉक ...

'Unlock Learning' for 28,000 Ashram School Students | आश्रमशाळांतील २८ हजार विद्यार्थ्यांसाठी ‘अनलॉक लर्निंग’

आश्रमशाळांतील २८ हजार विद्यार्थ्यांसाठी ‘अनलॉक लर्निंग’

हंसराज महाले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : आॅनलाईन कनेक्टीव्हीटीच्या समस्येवर मात करीत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाने ‘अनलॉक लर्निंग’ उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यात येणार आहे व त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला जाणार आहे.
कोरोना विषाणूमुळे राज्यात सर्वत्र शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे आॅनलाईन स्टडीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी ‘स्टडी फ्रॉम होम’ ही संकल्पना स्वीकारली. मात्र कनेक्टीव्हीटीच्या समस्येमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन स्टडी फ्रॉम होम ही संकल्पना वास्तवात उतरू शकत नव्हती. त्यातच नवीन शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाली असून लॉकडाऊनमुळे अद्याप शाळा सुरू होऊ शकलेल्या नसून लॉकडाऊन कालावधी कधी संपेल हे अनिश्चित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आदिवासी विकास विभागामार्फत आता ‘अनलॉक लर्निंग’ हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे.
या उपक्रमाचा पहिला टप्पा १ जुलै ते १५ आॅगस्ट २०२० असा ४५ दिवसांचा राहणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मागील शिकलेल्या मराठी, इंग्रजी, गणित, परिसर अभ्यास व विज्ञान या विषयांच्या मूलभूत क्षमतांवर आधारित कार्यपुस्तिका व सहशालेय उपक्रमांसाठी कृतीपुस्तिका विद्यार्थ्यांना घरपोच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आदिवासी विकास विभागातील कार्यरत तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांनी या कार्यपुस्तिका व कृतीपुस्तिका तयार केल्या आहेत. प्रकल्प कार्यालयामार्फत आपल्या कार्यक्षेत्रातील आश्रमशाळांमधील विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात दहा टक्के जास्त या कार्यपुस्तिका व कृतिपत्रिकांची प्रकल्पस्तरावरच छपाई करण्यात येणार आहे.
दुसरी ते दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक कार्यपुस्तिका व कृतीपुस्तिका देण्यात येणार आहे. ३० जून २०२० पर्यंत त्यांची छपाई करून विद्यार्थ्यांच्या घरी पोहोच करण्याचे आदेश आदिवासी विकास विभागाचे नाशिक आयुक्तालयाचे आयुक्त डॉ.किरण कुलकर्णी यांनी नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर येथील अपर आयुक्त व त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या आदेशानुसार तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यलयाकडून त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाºया आश्रमशाळांमध्ये ‘अनलॉक लर्निंग’ हा उपक्रम राबविण्याच्या नियोजनाला सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमात प्रत्येक विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचे सूक्ष्म नियोजन तळोदा प्रकल्प कार्यालयाकडून केले जात असून प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाºया तळोदा, अक्कलकुवा, धडगाव या तीन तालुक्यातील ४२ शासकीय व २१ अनुदानीत आश्रमशाळांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांच्या गावनिहाय याद्या तयार करण्यात आल्या आहेत. गावनिहाय शिक्षकांचा गट करून विद्यार्थी विभागून देण्यात येणार असून तो गट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना कार्यपुस्तिका व कृतीपुस्तिका वितरीत करणार आहे. शासकीय आश्रशाळांमध्ये शिकणाºया सुमारे १७ हजार तर अनुदानित आश्रमशाळेत शिकणाºया ११ हजार विद्यार्थ्यांना ‘अनलॉक लर्निंग’ या उपक्रमाचा लाभ होणार आहे.
लर्निंग किट होणार वाटप
अनलॉक लर्निंग या उपक्रमात आश्रमशाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांना घरी अभ्यासासाठी कार्यपुस्तिका व कृतीपुस्तिका देण्यात येणार आहे. याशिवाय विद्यार्थी शिकत असणाºया वर्गाची क्रमिक पाठ्यपुस्तके व कार्यपुस्तिका व कृतीपुस्तिका घरपोच पुरविण्यात येणार आहे. याशिवाय ‘अनलॉक लर्निंग’ या उपक्रमात आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला एक ‘लर्निंग किट’देखील दिली जाणार आहे. या लर्निंग किटमध्ये कार्यपुस्तिका, कृतिपुस्तिका, पाठ्यपुस्तके यांच्यासह पेन, पेन्सिल, खोडरबर, शॉपनर आणि स्कूल बॅग यांचा समावेश आहे.


अनलॉक लर्निंग या उपक्रमात विद्यार्थ्यांचा घरीच अभ्यास व्हावा यासाठी त्यांना घरपोच लर्निंग किट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. लर्निंग किट घेण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थी व पालक यांना शाळेत बोलावण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश आदिवासी विकास विभागाकडून देण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या प्रतिबंधात्मक सूचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून मुख्याध्यापकांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विद्यार्थ्यांच्या गृहभेटीचे नियोजन करावे व त्यानुसार विद्यार्थ्यांना घरपोच लर्निंग किटचे वितरण करावे, असे बजावण्यात आले आहे.

Web Title: 'Unlock Learning' for 28,000 Ashram School Students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.