आत्मनिर्भरतेसाठी तरूणाचा अनोखा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 12:19 IST2020-07-12T12:19:46+5:302020-07-12T12:19:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पुणे येथे सीएचे शिक्षण घेत असलेला परंतु लॉकडाऊनमुळे सध्या शहादा येथे आलेल्या आर्थिक दृष्ट्या ...

आत्मनिर्भरतेसाठी तरूणाचा अनोखा उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : पुणे येथे सीएचे शिक्षण घेत असलेला परंतु लॉकडाऊनमुळे सध्या शहादा येथे आलेल्या आर्थिक दृष्ट्या संपन्न कुटुंबातील एका तरूणाने रस्त्यावर टी शर्ट विक्रीचा प्रेरणादायी व्यवसाय सुरू करीत तरूणाईपुढे आदर्श निर्माण केला आहे. त्याची ही आत्मनिर्भर बनण्याची वाटचाल सर्वांसाठीच लक्षवेधी ठरत आहे.
शहरातील रहिवासी तथा तोरणमाळ येथील आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रदीप गणेश पाटील व म्युनिसीपल हायस्कूलच्या शिक्षिका सुजाता पाटील यांचा राजेंद्र हा एकुलता एक मुलगा. त्याला एक बहिण आहे. दोघे बहिण-भाऊ शिक्षण घेत असून, घरची समृद्ध शेतीदेखील आहे. घरात कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. आई-वडिलांनी नुकतीच सैनिक कल्याण निधीसाठी एक लाख रूपयाची देणगी दिली आहे. आजोबांनीही यापूर्वी सामाजिक जबाबदारी म्हणून समाजसेवेसाठी मोठ्या रक्कमेचे दान दिले आहे. राजेंद्र सध्या पुणे येथे सीए परीक्षेची तयारी करीत आहे.
लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून तो घरीच होता. घरात रिकामा बसणे किंवा टाईमपास करण्यापेक्षा वेळेचा सदुपयोग करण्याचे त्याचे ठरविले. शिक्षण पूर्ण झाले नसल्याने काय करता येईल याचा विचार करताना टी-शर्ट विक्री करण्याचे त्याने ठरविले. पालकांकडून १५ हजार रूपये घेऊन विविध रंगी, प्लेन, टी शर्ट ठोस भावाने विकत आणले. स्थानिक कारागीर शोधत त्या टी शर्टवर रंगीत स्लोगन, संत व प्रेरणादायी व्यक्तीमत्वाचे चित्र प्रिंट करून घेतले. मार्केटमध्ये वडिलांच्या मालकीचे दुकान असतानाही पंचायत समितीच्या भिंती लगत रस्त्यावर टीशर्ट विक्रीच्या व्यवसायाला सुरूवात केली. उत्तर भारतीयांच्या तोडीस तोड म्हणून सर्व युवकांनी व्यवसाय करताना लाज बाळगू नये ही प्रेरणा देण्याचे काम राजने अप्रत्यक्षपणे केले आहे. राज त्याच्या सोबत शिक्षण घेत असलेले मित्र लोकेश पाटील, आकाश पाटील, श्रीधर पाटील यांच्या मदतीने सध्या हा व्यवसाय करीत आहे. ऐश्वर्य संपन्न आणि दानशूर घराण्यातील राज रस्त्यावर एक छोटासा स्टॉल लावून टि शर्ट विकतोय. हे ऐकून आश्चर्य वाटेल व विश्वास बसणार नाही. मात्र हा उपक्रम सत्यात उतरविण्याची किमया चार्टर्ड अकाऊंटन्ट होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या तरूणाने सर्वांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
दरम्यान त्याच्या या टी शर्ट विक्री व्यवसायाबाबत वडील प्रदीप पाटील यांनी सांगितले. प्रारंभी त्याच्या निर्णयाबाबत मनात संभ्रम होता. परंतु राजच्या अभ्यासासोबतच स्वावलंबी होण्याचा विचारांसह वेळेचा सदुपयोग करत व्यवसायाचा अनुभव मिळेल या विचारातून सुरू केलेल्या या प्रेरणादायी प्रकल्पासाठी प्रोत्साहन दिले.