मनोज शेलारलोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : युवकांनी युवकांसाठी आयोजित केेलेल्या पोलीस व सैन्य दल भरतीपूर्व प्रशिक्षणाचा अनोखा उपक्रम सैताणे, ता.नंदुरबार येथील युवकांनी हाती घेतला आहे. शासकीय सहाय्य न घेता या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या पहिल्या चाचणी परिक्षेला सव्वाशेपेक्षा अधीक युवकांनी मैदानी व लेखी परिक्षेत सहभाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’च्या आवाहनाला या युवकांनी प्रतिसाद दिल्याचेच चित्र आहे. ग्रामिण भागातील, आपल्या गाव परिसरातील जास्तीत जास्त युवक पोलीस व सैन्यदलात सहभागी व्हावे, बेरोजगारीवर त्यांना मात करता यावी या उद्देशाने सैताणे येथील स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे संचालक हर्षल पाटील यांनी गावातील माजी सैनिक रावसाहेब पाटील, सद्या कार्यरत सैन्यदलातील जवान अशोक पाटील यांचे सहकार्य घेत व भूमीपूत्र परंतु विरार येथे ॲकेडमी चालविणारे विकास सोनवणे व योगेश पाटील यांचे सहकार्य घेत या प्रशिक्षणाला सुरुवात केली. त्याला युवकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला आहे. मैदानी व लेखी परीक्षाप्रशिक्षणानंतर या युवकांची पोलीस व सैन्य दलाच्या भरतीसाठी ज्या प्रकारे मैदानी व लेखी परीक्षा घेतली जाते त्याप्रमाणे परीक्षेेचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी गावठाणच्या जागेवर मैदान तयार करण्यात आले. तेथे धावणे, पूशअप यासह इतर मैदानी चाचणीसाठी आवश्यक सर्व सोय करण्यात आली. पहाटे सहा वाजेपासून मैदानी चाचणीला सुरुवात झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत सर्वच १३३ युवकांची मैदानी परीक्षा झाली. दुपारी भोजन अवकाश देण्यात आल्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात आली. सैन्यदल भरतीसाठी १०० गुणांची मैदाानी व ५० गुणांची लेखी परीक्षा घेतली गेली तर पोलीस भरतीसाठी १०० गुणांची लेखी व १०० गुणांची मैदानी परीक्षा झाली. या परीक्षेतूनही प्रत्येकी तीन क्रमांक काढण्यात आले. त्यांना प्रोत्साहन म्हणून रोख रक्कमेचे बक्षीसे देखील देण्यात आली. अभ्यासिकेची मदतगावात स्वामी विवेकानंद अभ्यासिका सुरू आहे. या ठिकाणी जास्तीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची पुस्तके आहेत. त्या माध्यमातून युवक अभ्यास करतात. याशिवाय वेळोवेळी स्पर्धा परीक्षा व्याख्यानांचे देखील आयोजन केले जात असते. त्याचाही फायदा युवकांना होत आहे. शहरी भागात पोलीस व सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी गरीब घरातील युवकांना राहाण्याचा, खाण्याचा तसेच इतर खर्च पेलावत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करून युवकांची तयारी करून घेण्यासाठी केलेला हा उपक्रम जिल्ह्यातील किंबहुना खान्देशातील पहिलाच असण्याची शक्यता आहे. या उपक्रमात गावातील युवक मंडळी आणि ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभल्याचे संयोजक हर्षल पाटील यांनी सांगितले.
सैताणे गावातील अनेक जण पोलीस दलात कार्यरत आहेत. याशिवाय सैन्यदलात देखील काहीजण आहेत. सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या जवानाचे गावात आल्यावर अनोख्या पद्धतीने स्वागत करण्याची परंपरा येथे आहे. याशिवाय पोलीस व सैनन्यदलात असलेल्यांकडून गावातील युवकांना नेहमीच मार्गदर्शन केले जाते. त्यांच्या एकत्रीत प्रयत्नात गावातील बेरोजगार युवकांसाठी अशा प्रकारचे कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र तयार व्हावे अशी अपेक्षा युवकांमधून व्यक्त होत आहे.
मैदानी व लेखी परीक्षा अगदी शास्त्रोक्त पद्धतीने घेण्यात आली. दोन्ही भरतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचे काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. त्यासाठी विरार येथे अकॅडमी चालविणाऱ्या दोन जणांना बोलविण्यात आले होते. या प्रशिक्षण व स्पर्धेत नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यातील काही युवकही सहभागी झाले होते. बाहेरगावच्या युवकांची दुपारच्या भोजनाची व्यवस्था तसेच आदल्या दिवशी रात्री राहण्याची व्यवस्था गावातच करण्यात आली होती.
गाव व परिसरातील युवकांना रोजगार मिळावा, स्पर्धा परीक्षेत ते यशस्वी व्हावे यासाठी स्वामी विवेकानंद अभ्यासिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचअंतर्गत पोलीस व सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण राबविण्यात आले. याचा फायदा युवकांना येत्या काळात होऊ घातलेल्या भरतीसाठी होईल. या उपक्रमात ग्रामस्थांचे मोठे सहकार्य मिळाले.-हर्षल पाटील, संयोजक, आर्मीमॅन युवा स्पर्धा परिक्षार्थी, सैताणे, ता.नंदुरबार.