सर्वधर्म समभाव जागृतीचा अनोखा फंडा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 12:49 IST2019-12-22T12:49:44+5:302019-12-22T12:49:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : भारतीय लोकसंस्कृती जीवंत ठेवण्यासाठी आपल्या उदरनिर्वाहाचे साधन बनवून लोकांमध्ये देशभक्ती जागृती करण्याचे काम नागपूर ...

Unique Fund for All Religion Awareness ...! | सर्वधर्म समभाव जागृतीचा अनोखा फंडा...!

सर्वधर्म समभाव जागृतीचा अनोखा फंडा...!

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : भारतीय लोकसंस्कृती जीवंत ठेवण्यासाठी आपल्या उदरनिर्वाहाचे साधन बनवून लोकांमध्ये देशभक्ती जागृती करण्याचे काम नागपूर येथील मुस्लीम कुटुंब करीत आहे. हे कुटुंब सध्या सारंगखेडा यात्रेनिमित्त शहादा परिसरात आले आहे.
भारतातील विविध राज्यातील कला, संस्कृती, गीत, बोलीभाषा वेगवेगळी आहे. असे असले तरी भारतीय लोक देशाचा व देशहिताचा विचार आल्यावर एकत्र येतात व देशभक्ती जागृत करण्याचे व ठेवण्याचे काम आजही करतात. या लोकसंस्कृतीच्या माध्यमातून बरेच जण आपला उदरनिर्वाहही चालवतात. नागपूर येथील रहमत शेख , सितारा शेख, संजूम शेख व अहमद शेख ही एकाच कुटूंबातील मंडळी आपली पोटाची खळगी भरण्यासाठी आपली कला गेल्या २५ वर्षापासून गावोगावी सादर करीत आहेत. या कुटुंबाने सारंगखेडा यात्रेत हजेरी लावून सध्या शहादा शहर व परिसरात कार्यक्रम सादर करीत आहेत. लोकगीते, भजन व कव्वालीचा माध्यमातून राज्यभर फिरुन हे कुटुंब आपला उदरनिर्वाह चालवतात. विशेष बाब म्हणजे हे कुटुंब मुस्लीम धर्मीय असूनही भगवान श्रीराम यांच्यावरील भजन म्हणतात तर शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडे, गीते व कव्वाली सादर करुन मनोरंजन करतात. शहादा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा गांधी पुतळा, दोंडाईचा रस्त्यावरील विश्रामगृह परिसर आदी ठिकाणी त्यांनी कार्यक्रम सादर केले. प्रेक्षकांनी ज्या विषयावर गाणे, पोवाडा, भजन म्हणावयास सांगितले ती कला हे कुटुंब सादर करून लोकांना मंत्रमुग्ध करते.
सारंगखेडा, ता.शहादा येथे राज्यातील मोठी यात्रा भरते याची माहिती मिळाल्यानंतर या कुटुंबाने या यात्रेत हजेरी लावून आपली कला सादर करण्याचे ठरविले. यात्रेत काही दिवस हजेरी लावल्यानंतर ते आता दोंडाईचा व शहादा शहरासह परिसरातील गावांमध्ये कार्यक्रम सादर करीत आहेत. या कुटुंबातील कलाकारांची भेट घेतली असता ते म्हणाले की, आपल्या देशात मैलामैलावर बोलीभाषा व कला बदलणारी आहे. विविधता असणाऱ्या या देशात हेवेदावे न करता संस्कृतीला दाद देऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Unique Fund for All Religion Awareness ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.