कोविड केअर सेंटर्स आणि आरोेग्य केंद्रांमध्ये उकाडा ठरतोय जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:31 IST2021-04-27T04:31:37+5:302021-04-27T04:31:37+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात पाच शासकीय रुग्णालय आणि १० कोविड केअर सेंटर निर्माण करत कोरोनाबाधितांची सोय करण्यात आली आहे. यातून ...

कोविड केअर सेंटर्स आणि आरोेग्य केंद्रांमध्ये उकाडा ठरतोय जीवघेणा
नंदुरबार : जिल्ह्यात पाच शासकीय रुग्णालय आणि १० कोविड केअर सेंटर निर्माण करत कोरोनाबाधितांची सोय करण्यात आली आहे. यातून एकूण ७६१ जण उपचार घेत आहेत. दरम्यान उपचार घेणाऱ्या निम्म्या रुग्णांना उकाड्याचा त्रास जाणवत असून सीसीसी सेंटर्समध्ये गारव्याची सर्वाधिक गरज असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.
जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. गेल्या एका वर्षात व्हेंटिलेटर बेड ते ऑक्सिजन प्लांट असा मोठा टप्पा पार पडला आहे. परंतु यात वातानुकूलित सुविधेला मात्र नकार देण्यात आला होता. परिणामी गेल्या वर्षात उकाडा होऊनही सोय केली गेली नव्हती. परंतु यंदा मात्र उकाडा वाढला असल्याने कोविड केअर सेंटर्समध्ये तरी कुलर द्या, अशी मागणी आहे. काही ठिकाणी पंखे लावूनही उपयोग होत नसल्याने बाधित रुग्ण हे गारव्यासाठी जागा शोधत सीसीसी सेंटर्समध्ये फिरत असल्याचे दिसून आले आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांनी घरून आणले कूलर व पंखे
उकाडा वाढल्याने रुग्णालयात उपचार घेणे मुश्किल होत असल्याने त्यावर पर्याय म्हणून अनेकांनी घरून पंखे आणि कूलर आणि जिल्हा रुग्णालयात आपआपल्या बेडसमोर लावून घेतल्याचे दिसून आले आहे. प्रथमच असा प्रकार दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नंदुरबार शहरातील एकलव्य कोविड केअर सेंटर तसेच तापी बिल्डिंगमधील कोविड केअर सेंटर्स हे शहरापासून लांबवर आणि मोकळ्या जागांवर आहेत. यातून त्या ठिकाणी दुपारच्यावेळी उष्ण वारे अधिक प्रकृर्षाने जाणवत आहेत.
जिल्ह्यातील सर्व १० कोविड केअर सेंटर्समध्ये जनरेटरची मात्र सोय करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यातून वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी वीज कंपनीसोबत संपर्क कायम ठेवण्यात आला असल्याचीही माहिती आरोग्य विभागातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.
एप्रिल तापला
जिल्ह्याचे सध्याचे तापमान हे ३९ ते ४१ डिग्री सेल्सिअस अंश एवढे आहे. यातून उष्ण व कोरडे वारे हे त्रासदायक ठरत आहेत.
मार्च महिन्यात तापमानाचा आकडा ३३ ते ३७ अंश एवढा होता. एप्रिलमध्ये तो वाढला आहे.
उकाडा वाढला असल्याने प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा आहे. इमारतीत पंखे असले तरी सिलिंगची उंची अधिक आहे. बाहेरून येणाऱ्या कोरड्या हवेमुळे त्यांचा काहीही उपयोग नाही.
- कोरोनाबाधित, कोविड केअर सेंटर, नंदुरबार
दुपारच्या वेळी बाहेरून उन्हाच्या झळा थेट रूममध्ये येत असल्याने हाल होत आहेत. उशिरापर्यंत गारवाच मिळत नसल्याने समस्या वाढत आहे. कोरोनापेक्षा उकाडाच अधिक त्रासदायक आहे.
- कोरोनाबाधित महिला, कोविड केअर सेंटर, नंदुरबार