दुचाकी चोरटा बादशहा अखेर एलसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:33 IST2021-08-27T04:33:23+5:302021-08-27T04:33:23+5:30

नंदुरबार- जिल्ह्यासह धुळे व गुजरात राज्यात दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याचा मुसक्या आवळण्यात एलसीबीला यश आले आहे. त्याच्याकडून एकुण ११ दुचाकी ...

Two-wheeler thief Badshah finally caught in LCB's trap | दुचाकी चोरटा बादशहा अखेर एलसीबीच्या जाळ्यात

दुचाकी चोरटा बादशहा अखेर एलसीबीच्या जाळ्यात

नंदुरबार- जिल्ह्यासह धुळे व गुजरात राज्यात दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याचा मुसक्या आवळण्यात एलसीबीला यश आले आहे. त्याच्याकडून एकुण ११ दुचाकी व एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीचे सत्र सुरू असून या चोरट्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. बादशहा कैलास राऊत, रा.काठीचा राऊतपाडा, ता.अक्कलकुवा असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरटे सापडत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे आणि भितीचे वातावरण आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास करण्याच्या सुचना एलसीबीला दिल्या होत्या. त्यानुसार एलसीबीचे निरिक्षक रवींद्र कळमकर यांनी यापूर्वी घडलेल्या घटना, लागलेला तपास, अटक करण्यात आलेले गुन्हेगार यांचा सविस्तर तपशील गोळा केला. त्यानुसार तपासाची दिशा ठरविली. याच दरम्यान, धडगाव येथे एकजण कमी किमतीत दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती कळमकर यांना मिळाली. त्यांनी लागलीच पथकाला कामाला लावले. पथक धडगाव येेथे दबा धरून बसलेले असतांना बादशहा राऊत हा तेथे आला. त्याला शिताफीने ताब्यात घेऊन वाहनाचे कागदपत्र विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. त्याने दुचाकी चोरीच्या घटनांची कबुली दिली. एक, दोन नव्हे तर तब्बल ११ दुचाकी त्याने चोरल्या होत्या.

त्याच्या काठीचा राऊतपाडा शिवारातील मक्याच्या शेतातून या दुचाकी लपविलेल्या होत्या त्या जप्त करण्यात आल्या. तेथेच मोबाईल देखील ठेवलेला होता. दुचाकी चोरीच्या घटना या नंदुरबार जिल्ह्यासह धुळे जिल्हा व गुजरात राज्यात केल्याचे उघड झाले आहे. अक्कलकुवा पोलीस ठाणे अंतर्गत तीन, धडगाव व मोलगी पोलीस ठाणेअंतर्गत प्रत्येकी एक, दोंडाईचा पोलीस ठाणेअंतर्गत एक, गुजरातमधील निझर व डेडीयापाडा पोलीस ठाणेअंतर्गत प्रत्येकी एकव इतर अशा ११ दुचाकी लंपास केल्याचे त्याने कबुल केले. पथकाने एकुण पाच लाख ८७ हजार रुपये किंमतीच्या ११ दुचाकी व एक मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयीत बादशहा कैलास राऊत यास अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक देवराम गवळी, एलसीबीचे निरिक्षक रवींद्र कळमकर, पोलीस कर्मचारी जितेंद्र अहिरराव, सुनील पाडवी, मनोज नाईक, विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, अभिमन्यू गावीत, शोएब शेख, सतिष घुले यांच्या पथकाने केली.

Web Title: Two-wheeler thief Badshah finally caught in LCB's trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.