नंदुरबारसह सहा शहरात दोन दिवस जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST2021-03-27T04:31:22+5:302021-03-27T04:31:22+5:30

नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोनाची संपर्क साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील सहाही तालुका मुख्यालयांच्या ठिकाणी शनिवार व ...

Two-day public curfew in six cities, including Nandurbar | नंदुरबारसह सहा शहरात दोन दिवस जनता कर्फ्यू

नंदुरबारसह सहा शहरात दोन दिवस जनता कर्फ्यू

नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोनाची संपर्क साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील सहाही तालुका मुख्यालयांच्या ठिकाणी शनिवार व रविवारी जनता कर्फ्यू राहणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील या सहाही शहरात तयारी करण्यात आली आहे. नागरिकांनीदेखील सहकार्य करावे, असे आवाहन

नंदुरबार जिल्ह्यात कोविड-१९ विषाणूबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा नगरपालिका क्षेत्र तसेच अक्राणी नगर पंचायत व अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रात प्रत्येक शनिवारी सकाळी सहा वाजेपासून ते सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी यापूर्वीच दिले असून, जनता कर्फ्युला स्वत:हून प्रतिसाद देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास अनुमती राहील. वैद्यकीय सेवा आणि औषध विक्रीच्या आस्थापना, गॅस वितरण सुविधा पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. वरील ठिकाणातील अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणाऱ्या वाहनासाठी पेट्रोलपंप सुरू राहतील, अन्य वापरासाठी प्रतिबंध असेल.

सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना व शासकीय कार्यालये या दिवशी बंद असल्याने शनिवार व रविवारी कोणीही बाहेर पडू नये. वैद्यकीय कारणास्तव बाहेर पडताना रुग्णालयातील संबंधित कागदपत्रे सोबत ठेवावी. कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, दोन दिवस बंद राहणार असल्यामुळे होळीच्या खरेदीसाठी शुक्रवारी बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. मास्क प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता; परंतु सोशल डिस्टन्सिंगचे पालन कुठेही दिसून आले नाही. बाजारात साखरेपासून तयार केलेले हार, कंगन, नारळ, खोबरे, खजूर यांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.

याशिवाय सोमवारी साजरा होणाऱ्या धूलीवंदनाकरितादेखील रंग, पिचकारी यांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता होळी व धूलीवंदन साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन यापूर्वीच करण्यात आले आहे.

Web Title: Two-day public curfew in six cities, including Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.