मानमोड्या वनक्षेत्रात अतिक्रमण करताना दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:36 IST2021-08-14T04:36:20+5:302021-08-14T04:36:20+5:30
तालुक्याच्या पूर्व भागात सुमारे ७० एकर राखीव वनक्षेत्र आहे. या परिसरात गुरुवारी पहाटेच्या दरम्यान वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत असतांना ...

मानमोड्या वनक्षेत्रात अतिक्रमण करताना दोघांना अटक
तालुक्याच्या पूर्व भागात सुमारे ७० एकर राखीव वनक्षेत्र आहे. या परिसरात गुरुवारी पहाटेच्या दरम्यान वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत असतांना त्यांना बालु रतनसिंग जाधव, सूरसिंग डेमचा पावरा रा.बडवाणी (मध्य प्रदेश ) हे दोघे वनक्षेत्रात अवैध प्रवेश करुन दोन हेक्टर क्षेत्रात झाडे झुडपे साफ करून नांगरटी करतांना आढळून आले. विभागाच्या पथकाने दोघा संशयितांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून बैलजोडी , नांगर , मोटरसायकल असे सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याबाबत वनरक्षक रोहिदास पावरा यांच्या फिर्यादीवरून दोघे संशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही उपवनसंरक्षक कृष्णा भवर , सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार , वनक्षेत्रपाल सचिन खुणे यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल एस . एस . इंदवे, वनरक्षक रोहिदास पावरा , ईलान गावित , गुलाब वसावे , नंदकुमार थोरात , बादशहा पिंजारी , डी डी पाटील , सुभाष मुकडे , अश्विनी चव्हाण , गंगोत्री चव्हाण , वाहन चालक नईम मिर्झा यांच्या पथकाने कारवाई केली.
दरम्यान जुलै महिन्यात याच परिसरात शहाणा लंगडी भवानी या भागातील सुमारे सात हेक्टर वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली होती. याबाबत गुन्हा दाखल असून संशयितांना अटक करण्याची कारवाई सुरू असताना पुन्हा आजच्या घटनेने या परिसरात जंगलतोड सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे वनविभागाने या भागात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावून जंगल वाचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत अशी अपेक्षा परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही गुन्ह्यातील सामाजिक बाब म्हणजे दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे मध्यप्रदेशातील रहिवासी असून स्थानिकांच्या मदतीने ते या भागात वृक्षतोड करत असून जंगला सह पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत.