अडीच लाख लोकांची झाली मोफत क्षुधाशांती कोरोनाळात मोफत शिवभोजन थाळीचे वाटप, जिल्ह्यात १६ केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:32 IST2021-08-26T04:32:25+5:302021-08-26T04:32:25+5:30

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. अशावेळी शासनाने गरजू नागरिकांना एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी नि:शुल्क उपलब्ध ...

Two and a half lakh people get free appetite | अडीच लाख लोकांची झाली मोफत क्षुधाशांती कोरोनाळात मोफत शिवभोजन थाळीचे वाटप, जिल्ह्यात १६ केंद्र

अडीच लाख लोकांची झाली मोफत क्षुधाशांती कोरोनाळात मोफत शिवभोजन थाळीचे वाटप, जिल्ह्यात १६ केंद्र

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. अशावेळी शासनाने गरजू नागरिकांना एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी नि:शुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा कालावधी वेळोवेळी वाढविण्यात आला आहे.

अक्कलकुवा तालुक्यात आतापर्यंत २७ हजार ७५१, अक्राणी ३१ हजार २८२, नंदुरबार ८८ हजार ७७५, नवापूर ३६ हजार ३२१, शहादा ३४ हजार ६२१ आणि तळोदा तालुक्यात ३६ हजार ८५८ थाळ्या नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोरोना कालावधीत प्रत्येक केंद्राच्या इष्टांकातही दीडपट वाढ केल्याने जिल्ह्यातील १६ शिवभोजन केंद्रांवरून दररोज २५५० थाळ्या वितरित होत आहेत.

राज्य शासनाने गरीब आणि गरजू व्यक्तींना अल्पदरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी २६ जानेवारी २०२० पासून केवळ दहा रुपयात शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नंतर थाळीचे शुल्क ५ रुपयापर्यंत कमी करण्यात आले. दुसऱ्या लाटेच्यावेळी कडक निर्बंध असल्याने १५ एप्रिलपासून ही थाळी नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे गरजूंना भोजनाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

योजनेच्या प्रारंभापासून आतापर्यंत एकूण ७ लाख ८६ हजार ६७३ थाळ्यांचे वितरण करण्यात आले असून त्यापैकी दोन लाख ५५ हजार ६१३ थाळ्या नि:शुल्क, पाच लाख १४ हजार ४१२ थाळ्या पाच रुपये शुल्क आकारून आणि १६ हजार ६४८ थाळ्या दहा रुपये शुल्क आकारून वितरित करण्यात आल्या आहेत.

योजनेंतर्गत २६ जानेवारी २०२० पासून अक्कलकुवा तालुक्यात ९० हजार २६३, अक्राणी ९६ हजार ४५५, नंदुरबार दोन लाख ६२ हजार ९३, नवापूर एक लाख सहा हजार २५०, शहादा एक लाख १३ हजार ९८६ आणि तळोदा तालुक्यात एक लाख १७ हजार ६२६ थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. एकूणच शिवभोजन थाळी संकटकाळात गरजू व्यक्तींना दिलासा देणारी ठरली आहे. आता १४ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व शिवभोजन थाळी केंद्रांवर ही थाळी मोफत देण्यात येणार आहे.

Web Title: Two and a half lakh people get free appetite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.