परीक्षा पुढे ढकलल्याने बारावीचे विद्यार्थी द्विधा मन:स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:31 IST2021-04-22T04:31:32+5:302021-04-22T04:31:32+5:30

शहादा : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने यंदा बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता द्विधा मन:स्थितीत ...

Twelfth grade students in a dilemma due to postponement of exams | परीक्षा पुढे ढकलल्याने बारावीचे विद्यार्थी द्विधा मन:स्थितीत

परीक्षा पुढे ढकलल्याने बारावीचे विद्यार्थी द्विधा मन:स्थितीत

शहादा : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने यंदा बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता द्विधा मन:स्थितीत असून, परीक्षा होईल किंवा नाही, याबाबतची संभ्रमावस्था कायम असली तरी नेमक्या परीक्षा उशिरा झाल्या तर पुढील अभ्यासक्रमाचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडणार असल्याने विद्यार्थी, पालकांसह शिक्षण क्षेत्रातही चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशा परिस्थितीत परीक्षेसाठी आवश्यक असलेले उत्तरपत्रिका व इतर महत्त्वाचे शालेय साहित्य सांभाळण्याचे टेन्शन मुख्याध्यापकांवर आले आहे. साधारणत: दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात बारावीच्या परीक्षांना सुरुवात होते तर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दहावीच्या परीक्षांना सुरुवात होते. विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील दहावी व बारावी हे दोन महत्त्वाचे टप्पे असणारे ही दोन वर्ष विद्यार्थी मन लावून अभ्यास करतात. मात्र, गेल्या मार्च २०२०पासून देशात कोरोना विषाणू संक्रमणाचे संकट उद्भवले. गतवर्षी दहावीचा पेपर झालाच नाही तर या शैक्षणिक वर्षात सुरुवातीला ऑनलाईन क्लासेस व त्यानंतर काही दिवस प्रत्यक्ष शाळेत शिक्षण घेत विद्यार्थ्यांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यातच खासगी क्लासेसला बंदी असल्याने संपूर्ण जोर ऑनलाईन शिक्षणावर होता. अशा विचित्र परिस्थितीत यंदा दहावी व बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थी सापडले होते.

परिस्थिती कशीही असो राज्याच्या शिक्षण विभागाने दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीचे घेण्याचे जानेवारी महिन्यात जाहीर केले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांची तयारी सुरू होती. शासन निर्णय आला थोडाफार वेळ होत परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्या, असा सूरही आळवला गेला. मात्र, अचानक परिस्थिती बिघडली व शिक्षण विभागाने अनिश्चित काळासाठी दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. साधारणत: जानेवारी महिन्यापासून दहावी व बारावीच्या परीक्षांबाबत नियोजन केले जाते. यासाठी आवश्यक असलेल्या उत्तरपत्रिका, होलोग्राम स्टिकर, बैठक व्यवस्था याबाबतचे सूक्ष्म नियोजन त्या-त्या परीक्षा केंद्रावरील केंद्रचालक यांच्याकडून केले जात होते. यावर तालुका पातळीवर तालुका शिक्षणाधिकाऱ्यांची देखरेख होत होती. आता परीक्षा अनिश्चित काळापर्यंत पुढे ढकलल्या गेल्याने परीक्षेसाठी आवश्यक असलेले सर्व शालेय शैक्षणिक साहित्य काळजीपूर्वक सांभाळण्याचे आव्हान मुख्याध्यापकांसमोर आहे. यासाठी जोपर्यंत परीक्षा होत नाही, तोपर्यंत काळजीपूर्वक हे सर्व साहित्य जपण्यासह पुढील निर्णयाचे नियोजन करण्यासाठी मुख्याध्यापकांना आता तारेवरची कसरत करावी लागणार आहे

1)

परीक्षा कधी घेण्यात येणार, याबाबत शासनाने निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे परीक्षा उशिरा झाल्या तर आगामी शालेय शैक्षणिक अभ्यासक्रमाचे वेळापत्रक कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

2)

परीक्षा उशिरा होणार असल्याने याचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संपूर्ण वर्षभर खुल्या वातावरणात प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षण घेता आले नाही. सतत ऑनलाईन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकलकोंडेपणाची जाणीव निर्माण झाली आहे.

3)

परीक्षा उशिरा झाल्या तर याचा सर्वात जास्त फटका बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना बसणार आहे. कारण वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेल्या स्पर्धा परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्याने पुढील शैक्षणिक वर्षातील संपूर्ण वेळापत्रकाचा बोऱ्या वाजणार आहे.

4)

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेली नीट व अभियांत्रिकी परीक्षेसाठी आवश्यक असलेली जेईई मेन यासह सीईटी या स्पर्धा परीक्षा कधी होणार, याची शाश्वती नाही. त्यातच ज्यांना संरक्षण दलातील अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा आहे, अशांसाठी कठीण प्रसंग निर्माण झाला आहे.

हे साहित्य कस्टडीत (बॉक्स)

कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोग्राम स्टीकर, सिटिंग प्लान, ए बी लिस्ट, विषयनिहाय, माध्यमनिहाय बारकोड, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य आदी परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण शालेय साहित्य पुढील तारखा जाहीर होत नाहीत तोपर्यंत मुख्याध्यापकांना सांभाळायचे आहे. त्यासाठी वेगळे नियोजन करावे लागणार आहे.

प्रतिक्रिया

परीक्षा उशिरा होण्याचा सर्वाधिक फटका बारावीच्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. साधारणत: २० मार्चपर्यंत परीक्षा पूर्ण होतात व त्यानंतर मे महिन्यात अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या स्पर्धा परीक्षा होत असतात. यासाठी विद्यार्थ्यांना दोन महिन्यांचा कालावधी मिळतो. आता बारावीच्या परीक्षा कधी होणार, याबाबत अनिश्चितता असल्याने विद्यार्थ्यांची मानसिकता खराब होत आहे. परीक्षेसाठी आवश्यक असलेले शालेय शैक्षणिक साहित्य परीक्षेबाबतचा पुढील आदेश येईपर्यंत सांभाळण्यासाठी वेगळे नियोजन करण्यात आले आहे.

- प्राचार्य आय. डी. पाटील,

शेठ व्ही. के. शहा विद्यामंदिर व कै. जी. एफ. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, शहादा.

कोरोना विषाणू संक्रमणामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण झालेला नाही. त्यातच परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या गेल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह कमी झाला आहे. मुळात परिसरातील भीतीदायक वातावरण व ऑनलाईन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता बिघडली आहे. निश्चितच याचा परिणाम विद्यार्थ्यांवर झालेला आहे. अशा परिस्थितीत दहावी व बारावीच्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा निरुत्साह व न्यूनगंड निर्माण झाला आहे.

- नयना पाटील,

प्राचार्या, व्हाॅलंटरी स्कूल, शहादा.

कोरोना महामारीत लोकांचे जीव धोक्यात आहेत. अर्थव्यवस्था कोलमडली आहे, दुसरीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संकटात सापडले आहे. वस्तुत: अध्ययनाचे सगळे संदर्भ सध्या बदलले आहेत. ते बहुतांशी ऑनलाईन झाले आहे. त्या अनुषंगाने मूल्यमापनही (परीक्षा) ऑनलाईन पध्दतीने व्हायला हरकत नाही. यात नेटवर्क नसलेल्या डोंगराळ, दुर्गम भागाच्या समस्या आहेत तेथील विद्यार्थ्यांना त्या सोई उपलब्ध करुन देवून त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून वाचू शकते. एकंदरीत जीव वाचवायचे की शैक्षणिक नुकसान, ह्या प्रश्नांच्या कात्रीत कोरोनारुपी वेताळाने शासनरुपी विक्रमादित्याला पकडले आहे, असे म्हणावे लागेल.

- प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील,

महाराज ज. पो. वळवी महाविद्यालय, धडगाव.

Web Title: Twelfth grade students in a dilemma due to postponement of exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.