कुष्ठरोगासोबतच क्षयरोगाचा विळखा होतोय घट्ट, शहादा तालुक्यातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST2021-01-10T04:24:07+5:302021-01-10T04:24:07+5:30

तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र वळवी यांच्या सनियंत्रणात कुष्ठरोगाचे एन.ए.एम.आर.एफ. ठाकरे, पी. एम. डब्ल्यू. सरवर बेलदार, क्षयरोगाचे एस.टी.एस. संजय निकुम, ...

Tuberculosis is spreading along with leprosy. Condition in Shahada taluka | कुष्ठरोगासोबतच क्षयरोगाचा विळखा होतोय घट्ट, शहादा तालुक्यातील स्थिती

कुष्ठरोगासोबतच क्षयरोगाचा विळखा होतोय घट्ट, शहादा तालुक्यातील स्थिती

तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र वळवी यांच्या सनियंत्रणात कुष्ठरोगाचे एन.ए.एम.आर.एफ. ठाकरे, पी. एम. डब्ल्यू. सरवर बेलदार, क्षयरोगाचे एस.टी.एस. संजय निकुम, मेघा खारकर यांच्या नियंत्रणात १ ते १६ डिसेंबर या कालावधीत शहर व ग्रामीण भागात कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोधमोहीम राबविण्यात आली. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी, स्वयंसेवक यांच्यामार्फत या मोहिमेंतर्गत शहादा तालुक्यातील ८० हजार ८३१ कुटुंबातून तीन लाख ८३ हजार ८६ नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. या तपासणी मोहिमेत अंगावरील चट्टे, हातपायाला मुंग्या येणे, स्नायूमध्ये अशक्तपणा, भुवयांवरील केस विरळ होणे, चेहरा तेलकट होणे, तळहात व तळपायाला बधीरता येणे अशी कुष्ठरोगाची लक्षणे असलेले संशयित रुग्ण ५७१ आढळून आले आहेत, तर दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, ताप, वजनात घट होणे, थुंकीवाटे रक्त जाणे, मानेवर गाठ येणे अशी लक्षणे असणारे ४७५ संशयित क्षयरोग रुग्ण आढळून आले. या संशयित रुग्णांची तपासणी केल्यानंतर ३८ जणांना कुष्ठरोग व २३ जणांना क्षयरोग असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली .

या भागात आढळले रुग्ण

शहादा तालुक्यात एकूण २९१ टीम कार्यरत होत्या. त्यात ५८६ कर्मचारी, ५८ सुपरवायझर यांची क्षयरोग व कुष्ठरोग मोहिमेसाठी नियुक्ती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांनी १ ते १६ डिसेंबर या कालावधीत तीन लाख ८३ हजार ८६ रुग्णांची तपासणी केली. यामध्ये शहादा शहरात कुष्ठरोग तीन व क्षयरोगाचे दोन रुग्ण आढळून आले. सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कुष्ठरोगाचे चार, तर क्षयरोगाचे पाच रुग्ण, वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कुष्ठरोगाचे तीन व क्षयरोगाचा एक रुग्ण, कहाटूळ, मंदाणे, शहाणा व कुसुमवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कुष्ठरोग व क्षयरोगाचा प्रत्येकी एक-एक रुग्ण आढळला. वाघर्डे आरोग्य केंद्रांतर्गत कुष्ठरोगाचे चार रुग्ण आढळले. आडगाव आरोग्य केंद्रांतर्गत कुष्ठरोगाचा एक तर क्षयरोगाचे चार रुग्ण, सुलवाडे केंद्रांतर्गत कुष्ठरोगाचे तीन व क्षयरोगाचा एक रुग्ण, कलसाडी केंद्रांतर्गत कुष्ठरोगाचे पाच व क्षयरोगाचे तीन रुग्णं, पाडळदा केंद्रांतर्गत कुष्ठरोग असलेले सात व क्षयरोगाचे दोन रुग्ण, प्रकाशा केंद्रांतर्गत कुष्ठरोगाचे दोन व क्षयरोगाचा एक, तर पुरुषोत्तमनगर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कुष्ठरोगाचे दोन रुग्णं आढळून आले आहेत.

उपचार मिळणार

आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी केलेल्या नागरिकांमधून कुष्ठरोगाच्या ३८ व क्षयरोगाच्या २३ रुग्णांवर उपचार करून त्यांना मोफत औषधी दिली जाणार आहे. तसेच क्षयरोगाच्या रुग्णांना उपचारादरम्यान दरमहा ५०० रुपये तसेच ७५० रुपये असे एकूण सहा महिन्यांचे तीन हजार ७५० रुपये मिळणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

तपासणी मोहिमेत कुष्ठरोग व क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले असून, रुग्णांवर मोफत औषध उपचार सुरू आहेत. बाधित रुग्णांना योग्य ती काळजी घेऊन सहा ते नऊ महिने औषधोपचार सुरू राहणार आहे.

-डॉ.राजेंद्र वळवी, तालुका वैद्यकीय अधिकारी, शहादा

Web Title: Tuberculosis is spreading along with leprosy. Condition in Shahada taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.