तळोद्यात स्वीकृत नगरसेवकपदावरून दोन पदाधिकाऱ्यांमध्ये तू-तू, मैं-मैं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:31 IST2021-08-15T04:31:17+5:302021-08-15T04:31:17+5:30

तळोदा : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची तळोद्यातील संवाद यात्रेच्या नियोजनासंदर्भात शुक्रवारी सकाळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तळोदा ...

Tu-tu, me-me between the two office bearers from the sanctioned corporator post in Talodya | तळोद्यात स्वीकृत नगरसेवकपदावरून दोन पदाधिकाऱ्यांमध्ये तू-तू, मैं-मैं

तळोद्यात स्वीकृत नगरसेवकपदावरून दोन पदाधिकाऱ्यांमध्ये तू-तू, मैं-मैं

तळोदा : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची तळोद्यातील संवाद यात्रेच्या नियोजनासंदर्भात शुक्रवारी सकाळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तळोदा येथील आमदार कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत स्वीकृत नगरसेवक पदावरून दोन पदाधिकाऱ्यांची चांगलीच हमरीतुमरी झाली होती. शेवटी वाढता वाद पाहून आमदार राजेश पाडवी यांनी दोघांमध्ये समेट घडवून आणून या वादावर तात्पुरता पडदा पाडला आहे; परंतु याची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली होती.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची जनसंवाद यात्रा १६ ऑगस्टपासून नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत निघणार आहे. त्या संवाद यात्रेच्या निमित्ताने तळोदा येथेही १९ रोजी महिला मेळावा नियोजित केला आहे.

या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आमदार कार्यालयात आमदार राजेश पाडवी यांनी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी, ओबीसी सेलचे प्रदीप शेंडे, सभापती यशवंत ठाकरे, जितेंद्र पाडवी, नारायण ठाकरे, प्रवीणसिंह गिरासे, निलाबेन मेहता, असे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यादरम्यान युवा मोर्चाचे जगदीश परदेशी या पदाधिकाऱ्याने स्वीकृत नगरसेवकांचा रेंगाळलेला मुद्दा उपस्थित केला होता.

त्याच वेळी या पदावर असलेले स्वीकृत नगरसेवक हेमलाल मगरे यांना तो चांगलाच झोंबला होता. यातून दोघांत तू-तू, मैं-मैं झाली. त्यांनी राजीनामा देण्याबाबत साफ नकार दिला. त्यामुळे दुसरे इच्छुक परदेशी हेही संतापले. यातून प्रकरण हातघाईवर येणार असल्याची चिन्हे दिसताच आमदार पाडवी व नगराध्यक्ष परदेशी यांनी मध्यस्थी करून सदर विषयावर नंतर निर्णय घेऊ असे म्हणत या वादावर तात्पुरते सोल्युशन काढले आहे. मात्र, भाजपच्या या बैठकीतील पदाधिकाऱ्यांमधील कलगीतुऱ्याने शहरातील राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. तसे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये सातत्याने रुसवे, फुगवे चालू असतात. ते कार्यक्रमांतूनदेखील समोर आले आहेत.

वर्षभरापासून या विषयावर सुरू आहे धुसफूस

नगरपालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर स्वीकृत नगरसेवक पदासाठी अनेक जण इच्छुक होते. विशेषत: पराभूत उमेदवारच यात आघाडीवर होते. मात्र, विषय समित्या व स्वीकृत नगरसेवक निवडीच्या वेळी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या पदावर समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेण्याचा निर्णय घेतला होता. साहजिकच पहिल्या वर्षी म्हणजे फॉर्म्युल्यानुसार शहरातील बहुजन माळी समाजास देण्याचा धोरणात्मक निर्णयदेखील झाला होता. या सूत्रानुसार माळी समाजातील हेमलाल मगरे यांची वर्णी लावण्यात आली होती; परंतु त्यापुढे याबाबत पदाधिकाऱ्यांनी काहीच कार्यवाही केली नाही. याउलट मौन पाळून हा मुद्दा तसाच रेंगाळत ठेवला आहे. त्यामुळे वर्षभरापासून पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच शुक्रवारच्या बैठकीतदेखील त्याचे पडसाद उमटले होते. आता याप्रकरणी भाजपचे पक्ष संघटन काय भूमिका घेते याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. शिवाय घडलेल्या प्रकाराबाबतही उघड, उघड नाराजी व्यक्त केली जात आहे.

Web Title: Tu-tu, me-me between the two office bearers from the sanctioned corporator post in Talodya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.