ट्रूनेट कोरोना चाचणी मशीन बनले शोभेचे बाहुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 12:43 IST2020-09-13T12:42:45+5:302020-09-13T12:43:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात रॅपीड अ‍ॅण्टीजन टेस्टसाठी खास असे केद्र करण्यात आलेले नाहीत. आरटीपीसीआर चाचण्यांवरच भर देण्यात ...

Trunet corona test machine became ornamental arms | ट्रूनेट कोरोना चाचणी मशीन बनले शोभेचे बाहुले

ट्रूनेट कोरोना चाचणी मशीन बनले शोभेचे बाहुले


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात रॅपीड अ‍ॅण्टीजन टेस्टसाठी खास असे केद्र करण्यात आलेले नाहीत. आरटीपीसीआर चाचण्यांवरच भर देण्यात येत आहे. आतापर्यंत तब्बल ११ हजार ५२३ चाचण्या आरटीपीसीआरच्या झाल्या आहेत. येत्या काळात जर कोरोना बाधीतांची संख्या वाढली तर तसे केद्र करण्याचे देखील नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत रॅपीडच्या केवळ ६२१ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ट्रूनेट आता शोभेचे बाहुले बनले आहे.
जिल्ह्यात अद्यापही कोरोना चाचण्यांची मर्यादीत संख्या आहे. त्यामुळे तालुका स्तरावर कॅम्प घेऊन किंवा केंद्र करून रॅपीड चाचण्यांची गरज पडलेली नाही. परंतु येत्या काळात जर रुग्ण संख्या वाढली तर त्याचेही नियोजन ठेवण्यात आले आहे.
ट्रूनेटही जेमतेमच
नंदुरबारात कोरोना चाचणीची सोय व्हावी म्हणून तातडीने ट्रूनेट मशीन मागविण्यात आले होेते. परंतु याद्वारे चाचणी करण्याचे प्रमाण अगदीच अत्यल्प राहिले आहे. केवळ १३० चाचण्या करण्यात आल्या. त्यातील ३५ जण पॉझिटिव्ह निघाले. केवळ १३० चाचण्यांसाठी झालेल्या लाखो रुपये खर्चाबाबत आता साशंकता उपस्थित होत आहे. जर आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा सुरू होणार होती तर ट्रूनेटची घाई का करण्यात आली. त्याऐवजी रॅपीड अ‍ॅण्टीजन टेस्ट सुरू केल्या असत्या तरी ते चालणारे होते.
मशीन धूळखात पडून
ट्रूनेट मशीनवर कोरोना चाचणीच होत नसल्याने हे मशीन आता धूळखात पडून आहे. सर्व भर हा आरटीपीसीआर चाचण्यांवर आहे. या मशीनचा दुसरा काही उपयोग होऊ शकतो किंवा कसा याबाबतही आता चाचपणी सुरू आहे.
अहवालाबाबत साशंकता
रॅपीडच्या अहवालाबाबत साशंकता व्यक्त केली जाते. जर अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्या व्यक्तीची पुन्हा आरटीपीसीआर चाचणी घेतली जाते. त्यातही अहवाल पॉझिटिव्ह आला तर रॅपीडचा अहवाल मान्य केला जातो. येथे झालेल्या ६२१ चाचण्यांमध्ये आरटीपीसीआर केल्यानंतरची स्थितीचे प्रमाण हे ७०:३० असे राहिले आहे.
रॅपीडच्या आतापर्यंतच्या ६२१ चाचण्यांमध्ये केवळ १४० अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. जे रुग्ण संशयीत आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यांना तातडीने कोव्हिडचे उपचार करणे आवश्यक आहे अशा रुग्णांचीच केवळ रॅपीड टेस्ट केली गेली आहे. या चाचणीचा अहवाल अवघ्या अर्धा तासात प्राप्त होतो. अहवाल मात्र लेखी स्वरूपात रुग्णाला दिला जात नाही. केवळ रुग्णालयाच्या यादीत ते नाव पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असे येते.
सर्वाधिक आरटीपीसीआर
आतापर्यंत सर्वाधिक अर्थात ११ हजार ५२३ चाचण्या या आरटीपीसीआरच्या करण्यात आल्या आहेत. त्यात नंदुरबार येथील प्रयोग शाळेत सहा हजार ३३८ तर धुळे येथील प्रयोगशाळेत पाच हजार १८५ जणांच्या चाचणीचा समावेश आहे.
कर्मचारी संख्या वाढवावी
आरटीपीसीआर चाचणीसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविल्यास चाचण्या लवकर होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी प्रशिक्षीत आणखी कर्मचारी या ठिकाणी नेमण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे.
राज्यातील इतर जिल्ह्यात तालुका स्तरावर रॅपीड अ‍ॅण्टीजेन चाचण्यांसाठी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हास्तरीय प्रयोगशाळेवर फारसा ताण पडत नाही. नंदुरबारात देखील ट्रूनेटद्वारे ठिकठिकाणी चाचणी करण्यासाठी सोय करण्याची गरज आहे.
आरटीपीसीआर चाचण्यांची पुरेशी सोय येथे आहे. त्यामुळे रॅपीड अ‍ॅण्टीजनची व ट्रूनेटची गरज फारशी भासत नाही. जे संशयीत रुग्ण आहेत व त्यांना उपचाराची तातडीची गरज आहे अशांचीच केवळ ही चाचणी केली जाते. असे असले तरी भविष्यात रुग्ण वाढले तर रॅपीड चाचण्यांसाठी केंद्राची सोय होऊ शकते.
-डॉ.के.डी.सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक. नंदुरबार.
 

Web Title: Trunet corona test machine became ornamental arms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.