अक्कलकुव्याजवळ ट्रक उलटून अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 13:15 IST2020-12-15T13:15:24+5:302020-12-15T13:15:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहिर : शेवाळी ते नेत्रंग महामार्गावर अक्कलकुवा शहराजवळ खड्ड्यात आदळून ट्रक उलटल्याची घटना रविवारी रात्री घडली. ...

अक्कलकुव्याजवळ ट्रक उलटून अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहिर : शेवाळी ते नेत्रंग महामार्गावर अक्कलकुवा शहराजवळ खड्ड्यात आदळून ट्रक उलटल्याची घटना रविवारी रात्री घडली. अपघातात ट्रकचे नुकसान झाले आहे.
नागपूरहून अहमदाबादकडे केमिकल वाहून नेणारा ट्रक क्रमांक एमएच ४० वाय-९२४४ रविवारी रात्री महामार्गावर वाण्याविहीर ते अक्कलकुवादरम्यान अचानक उलटल्याचे दिसून आले. भरधाव वेगातील ट्रक खड्ड्यात आदळून हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले आहे. अपघातात चालक आणि वाहक दोघेही बचावले असल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. शेवाळी ते नेत्रंग महामार्गावर वाण्याविहीर ते राजमोही व अक्कलकुवा शहरादरम्यान मोठेमोठे खड्डे पडून रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. यातून वाहनधारक खड्डे टाळण्यासाठी भरधाव वेगातही कसरत करत आहेत. याच दरम्यान अशा प्रकारचे अपघात होत आहेत. या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त होऊनही कारवाई करण्यात आलेली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
राजमोही फाटा ते मोलगी नाका यादरम्यान मोठमोठे खड्डे असल्याने अवजड वाहनचालक त्यांना टाळून वाहने पुढे काढण्याचा प्रयत्न करतात. यातून वाहनांचा कट लागणे, दुचाकी घसरणे यासह छोटेमोठे अपघात नित्याचे झाले असल्याची माहिती आहे.