ट्रकने उडविला पृथ्वी स्तंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 12:46 IST2020-09-05T12:46:17+5:302020-09-05T12:46:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अपघातग्रस्त ट्रक पोलिस ठाण्यात जमा करण्यासाठी आणत असताना अचानक ब्रेक फेल झाल्याने ट्रकने स्टेट ...

ट्रकने उडविला पृथ्वी स्तंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अपघातग्रस्त ट्रक पोलिस ठाण्यात जमा करण्यासाठी आणत असताना अचानक ब्रेक फेल झाल्याने ट्रकने स्टेट बँकेसमोरील लायन्सच्या सुशोभिकरण स्तंभाला धडक दिली. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मोठ्या प्रमाणावर वर्दळ असलेल्या या चौकात सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, अपघातग्रस्त ट्रकची पुर्णत: तपासणी न करताच ती पोलीस ठाण्यात जमा करण्याची घाई का करण्यात आली याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नवापूर ते कोळदा दरम्यान रस्ता दुरूस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे त्या मार्गावरील रेल्वेगेट बंद असल्याने नवापूर-धुळे मार्गावरील वाहतूक ही उच्छल, निझर, नंदुरबारमार्गे वळविण्यात आली आहे. परिणामी या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ राहत आहे. त्यातील अवजड ट्रकचा (क्रमांक टीएन ५२-जे. ८३७६) शुक्रवारी सकाळी चौपाळे शिवारात अपघात झाला होता. अपघातग्रस्त ट्रक सायंकाळी पोलिसांनी तालुका पोलीस ठाण्यात जमा करण्यासाठी आणण्याचे ठरविले आणि हा अपघात झाला.
अपघातग्रस्त ट्रक खाजगी चालकाला घेऊन पोलिसांनी शहरातील वर्दळीच्या रस्त्याने आणली. वाघेश्वरी चौफुली ते स्टेट बँक मार्गावर मोठा मारुती मंदीराजळ ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाले. सायंकाळची वेळ असल्याने मोठा मारुती ते स्टेट बँक दरम्यान मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. जीवीत हानी टाळण्यासाठी चालकाने कसोशिने प्रयत्न केले.
ट्रक गिअरच्या माध्यमातून नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश येत नसल्याचे पाहून चालकाने ट्रक थांबविण्यासाठी थेट स्टेट बँकसमोरील रस्ता दुभाजकात लायन्सने उभारलेल्या पृथ्वीच्या प्रतिकृतीला धडक दिली. त्यात पृथ्वीच्या प्रतिकृतीचा स्तंभ पुर्णत: ट्रकखाली दाबला गेला. त्यामुळे ट्रक थांबण्यास मदत झाली. सुदैवाने यावेळी कुणीही दुचाकी किंवा इतर वाहन त्यावेळी आले नसल्याने मोठा अनर्थ टळला.
अपघात भयंकर आणि त्याचा आवाज एवढा मोठा होता की त्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली. बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. जर सकाळच्या वेळी ही घटना घडली असती तर जीवीत हानी झाली असती असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
याबाबत रात्री उशीरापर्यंत पोलिसात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.