जुलैपेक्षा आॅगस्टमध्ये तिप्पट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 12:22 IST2020-08-23T12:22:11+5:302020-08-23T12:22:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जुलै महिन्याच्या तुलनेत आॅगस्ट महिन्यात अवघ्या २२ दिवसात तीन पटीने कोरोना रुग्ण वाढले आहेत. ...

जुलैपेक्षा आॅगस्टमध्ये तिप्पट वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जुलै महिन्याच्या तुलनेत आॅगस्ट महिन्यात अवघ्या २२ दिवसात तीन पटीने कोरोना रुग्ण वाढले आहेत. अॅक्टीव्ह रुग्णांचे प्रमाण देखील दुप्पटीने वाढले आहेत. मृत्यूचे प्रमाण मात्र दोन्ही महिन्यात जवळपास सारखेच आहे. आॅगस्ट महिन्यात मात्र कोरोना चाचण्यांची संख्या दुप्पट वाढविण्यात आली आहे. यापुढील काळात देखील कोरोना चाचण्या वाढविण्यात येणार असल्याने रुग्णांची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे कोविड उपचार कक्ष आणि क्वॉरंटाईन केद्रांची संख्या वाढविण्याचा विचार सुरू आहे.
जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या मर्यादीत होती. १८ एप्रिलला पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. एप्रिल व मे महिन्यात रुग्ण संख्या मर्यादीत राहिली. परंतु जून महिन्यापासून ती वाढण्यास सुरुवात झाली. जुलै महिन्यात ५०० चा आकडा तर आॅगस्ट महिन्यात दीड हजाराचा टप्पा पार झाला. रुग्ण संख्या आणि मृृत्यू संख्या यात देखील सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे.
जुलै महिन्यात ३९२ रुग्ण
जुलै महिन्यात ३९२ रुग्ण आढळून आले होते. जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोरोना बाधीतांची संख्या १६३ होती ती ३१ जुलै रोजी ५५५ पर्यंत गेली होती. कोरोना बाधीतांच्या मृत्यूची संख्या देखील २३ होती. ३० जून रोजी पर्यंत ८ जणांचा मृत्यू झालेला होता तर ३१ जुलै पर्यंत तो आकडा ३१ पर्यंत गेला होता. अॅक्टीव्ह रुग्ण संख्या देखील महिनाभरात ७४ वरून ३८१ झाली होती. जुलै महिन्यात अनलॉक २ सुरु झाला होता. अनेक बाबींना सूट देण्यात आली होती. जिल्हाअंतर्गत बसेस देखील सुरू झाल्या होत्या. त्यामुळे रुग्ण संख्या वाढू लागली होती. ती आॅगस्ट महिन्यात देखील कायम आहे.
आॅगस्ट ११०५ रुग्ण
आॅगस्ट महिन्याच्या २२ दिवसात तब्बल एक हजार १०५ रुग्ण आढळून आले आहेत. जवळपास तिप्पटपेक्षा अधीक पटीने हे रुग्ण आढळून आले आहेत. आॅगस्ट महिन्यात फक्त नंदुरबार, शहादा व नवापूर शहरात रुग्ण संख्या मर्यादीत न राहता ग्रामिण भागातील अनेक गावांमध्ये देखील कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाने ग्रामिण भागात देखील प्रादुर्भाव वाढविण्यास सुरुवात केली आहे.
आॅगस्ट महिन्यात बाधीत रुग्णांसह मृतांची संख्या देखील वाढली आहे. २२ दिवसात २६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मृतांमध्ये या महिन्यात १६ वर्षाच्या मुलासह ७० वर्षाच्या वृद्धाचाही त्यात समावेश आहे.
यशिवाय अॅक्टीव्ह रुग्ण संख्येत देखील जुलैच्या तुलनेत दुप्पट वाढ नोंदविली गेली आहे. नंदुरबारात दोन ठिकाणी, शहादा, तळोदा येथे एक ठिकाणी तसेच नव्याने नवापूर येथे कोविड उपचार कक्ष सुरू करण्यात येणार आहे.
नंदुरबारात स्वॅब तपासणी प्रयोगशाळा सुरू झाल्यानंतर स्वॅब संकलन आणि त्याचे रिपोर्ट येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बाधितांची संख्या वाढल्याचे बोलले जात आहे. आता स्वॅब संकलनानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी अहवाल मिळेल अशी सोय करण्यात आली आहे. त्यामुळे अॅक्टीव्ह पेशंटकडून इतरांना बाधा होण्याचे प्रमाण कमी होईल.