कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक संदेश देत साजरा होणार आदिवासी दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 12:44 IST2020-08-09T12:44:21+5:302020-08-09T12:44:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दरवर्षाप्रमाणे यंदा आदिवासी दिनाचे सामुहिक कार्यक्रम राहणार नाही, भव्यदिव्य आणि आदिवासी संस्कृतीची ओळख दाखविणारी ...

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक संदेश देत साजरा होणार आदिवासी दिन
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दरवर्षाप्रमाणे यंदा आदिवासी दिनाचे सामुहिक कार्यक्रम राहणार नाही, भव्यदिव्य आणि आदिवासी संस्कृतीची ओळख दाखविणारी रॅलीही नाही आणि समाजप्रबोधपर व्याख्यानेही राहणार नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गावागावात सामाजिक उपक्रम राबवून यंदाचा आदिवासी दिन साजरा होणार आहे. मात्र, युवकांमध्ये या निमित्ताने उत्साह व जोश मात्र कायम असल्याचे चित्र आहे.
आदिवासी दिनाचा दरवर्षी मोठा उत्साह असतो. नंदुरबारात जिल्हास्तरीय सोहळा साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त जिल्हाभरातील आदिवासी बांधव, विद्यार्थी, विचारवंत एकत्र येतात. यानिमित्ताने आदिवासी संस्कृतीचेही दर्शन घडते. यंदा मात्र कोरोनामुळे सामुहिक व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आहे. त्यामुळे यंदाचा आदिवासी दिन गावागावात साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. आदिवासी महासंघ व जिल्हा प्रशासनाने याबाबत आवाहन केल्याने त्यांच्या आवाहनाला समाजाने प्रतिसाद दिला आहे.
त्यामुळे यंदा आदिवासी दिन सार्वजनिक रित्या साजरा न होता गावागावात साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. त्याअंतर्गत सामाजिक उपक्रम, वैचारिक प्रबोधन, वृक्ष लागवड यासह इतर उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने गावागावात तयारीही करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक अंतर पाळून आणि आवश्यक त्या सर्व सुचनांचे पालन करून हा दिवस साजरा करावा असे आवाहन आदिवासी महासंघ व प्रशासनाने केले आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत इथल्या आदिवासी बांधवाचे महत्वाचे योगदान आहे. झपाट्याने बदलणाऱ्या जगात नव्याची कास धरतानाच आदिवासी समाजाने आपली सांस्कृतिक परंपरा टिकवून ठेवली आहे. केवळ संस्कृतीच नव्हे तर महाराष्ट्राला लाभलेल्या विपुल निसर्गसंपदेचे संरक्षण व संवर्धन करण्यातही आदिवासी समाजाचा मोठा वाटा आहे. लोकसहभाग व लोकांच्या प्रश्नांची जाणीव असणारे संवेदनशील नेतृत्व जेव्हा एकदिलाने काम करतात तेव्हा दुर्गम भागाचे चित्र झपाट्याने बदलू शकते असे मत आदिवासी विकास मंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी या निमित्ताने व्यक्त केले.