तोरखेडा व अभनपूर शिवारात वृक्षांची तोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:40 IST2021-06-16T04:40:18+5:302021-06-16T04:40:18+5:30
कोळसा माफियांचे प्रताप परिसरातील अडगळीचे व काटेरी वृक्ष तोडून त्यापासून कोळसा तयार करण्याची भन्नाट कल्पना बाहेरगावाहून आलेल्या काहींच्या डोक्यात ...

तोरखेडा व अभनपूर शिवारात वृक्षांची तोड
कोळसा माफियांचे प्रताप
परिसरातील अडगळीचे व काटेरी वृक्ष तोडून त्यापासून कोळसा तयार करण्याची भन्नाट कल्पना बाहेरगावाहून आलेल्या काहींच्या डोक्यात आली. त्यातूनच सुरुवातीला तोरखेडा गावाच्या दक्षिणेकडील तापी नदी व स्मशानभूमी परिसरातील काटेरी बाभूळ उपटून कोळसा तयार करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी ग्रामपंचायत, वन व महसूल विभाग यापैकी कोणाचीही परवानगी घेण्यात आली नाही. अडचणीचे ठरणारे काटेरी झाडे कमी होत असल्याने एक चांगले काम म्हणून कोणाचीही त्याबद्दल तक्रार नव्हती. मात्र, ही झाडे संपल्याने तसेच कमी श्रमात पैसा उपलब्ध होऊ लागल्याने या कोळसा माफियांनी हळूहळू तोरखेडापासून उत्तरेकडील अभनपूर गाव शिवारातील शेतीचे बांध व नदी-नाला परिसराकडे आपला मोर्चा वळविला. त्यात त्यांनी अनेक मोठे वृक्ष, वेली आणि कंदमुळे यांचा मुळासकट नायनाट करायला सुरुवात केली. एका वृक्षाभोवती दोन ते तीन वेली व कंदमुळे असतात. पळस, कंसार, व्हेंकळ, तेल्या बाभूळ, एलातूर, खैर, सलई, बेल, कोकरून, पिप्रीन, जंगली मिरची व यासारखे अनेक आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असलेले वृक्ष, यासोबतच या वृक्षांच्या सान्निध्यातील गुळवेल, शतावरी, वासनवेल, देव्या वेल, फागवेल, गुंजावेल यासारख्या अनेक वेली तसेच मिरची कंदसारखे अनेक वृक्ष, वेली व कंदमुळे कोळसा तयार करण्यासाठी समूळ नष्ट केले जात आहे.
कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन देणारे चांगले मोठे वृक्षदेखील नष्ट केले जात आहेत. परिणामी या परिसरातील तापमानात दोन अंशाने वाढ तर वृक्षांअभावी पर्जन्यमान कमी होत आहे. वृक्षतोडीमुळे परिसरातील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यात पशुपक्षी, जीवजंतू व मानव यांना व येणाऱ्या पिढ्यांना खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो. परिसरात असलेल्या सर्व पशुपक्ष्यांचा निवारा नष्ट होत आहे. देशाचा राष्ट्रीय पक्षी मोर यांची संख्या येथे लक्षणीय आहे. सध्या हे मोर संध्याकाळच्या वेळेस गावाकडे येऊ लागले आहेत. तसेच त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. मोरांना निवारा नसल्याने ते तोरखेडा येथील अमरधामवर बसून पशुपक्ष्यांवर येणाऱ्या संकटाची हाक देत आहेत.
माफियांना पकडण्याचे आवाहन
नोव्हेंबर २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीत ओल्या लाकडांच्या भट्ट्या गावालगत कोळसा तयार करण्यासाठी लावल्या जात होत्या. त्यातून मोठ्या प्रमाणात विषारी वायू निघत असल्यामुळे गावातील लहान मुले व वृद्धांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. तरीही भीतीपोटी नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. हे कोळसा माफिया गाव सोडून पळून जाण्याच्या आधीच त्यांच्यावर संबंधित विभागाने मुळासकट उपटलेल्या वृक्षांचा पंचनामा करून गुन्हे दाखल करणे अत्यावश्यक ठरले आहे. तसेच वृक्ष समूळ काढण्यासाठी वापरलेले जेसीबी मशीन ताब्यात घेऊन संबंधितांवर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोळसा माफियांनी परिसरात मुळासकट उपटलेल्या वृक्षांच्या जागी १० बाय १० फूट अंतरावर कडूनिंब, चिंच, आवळा, जांभूळ, पिंपळ, उंबर व यासारखे ऑक्सिजन देणारे वृक्ष लावावे व त्या वृक्षांचे पाच वर्षांपर्यंत योग्य संगोपन करण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याकरिता पर्यावरण व जैवविविधता क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी दखल घेत तोरखेडा व अभनपूरची जैववैविधता पुनर्स्थापित करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.