शहाद्यात वाहतूक सप्ताहाचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 11:53 IST2019-02-14T11:53:39+5:302019-02-14T11:53:44+5:30
वाहतुक सुरक्षा सप्ताह : अनेक चौकात वाहतुकीची कोंडी; नियमांचे उल्लंघन

शहाद्यात वाहतूक सप्ताहाचा फज्जा
शहादा : गेल्या आठवड्याभरापासून राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत जिल्हाभरात विविध कार्यक्रम घेण्यात येत असले तरी शहाद्यात मात्र त्याचा पुरता फज्जा उडाला आहे. शहरातील बस स्थानक, गांधी पुतळा, स्टेट बँक, मेनरोड आदी चौकांमध्ये अनेकजण वाहतुकीचे नियम मोडताना दिसत आहेत.
दरवर्षी जानेवारी महिन्यात वाहतूक सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. यंदा महिनाभर उशिराने सप्ताह साजरा होत आहे. रस्ता सुरक्षासप्ताहावर ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात सुरक्षा सप्ताह फक्त उद्घाटना पुरताच मर्यादित असल्याचे दिसून येते. शहरातील डोंगरगाव रोडवरील खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी दिसून येत आहेत. काही प्रवासी तर जीवाची पर्वा न करता गाडीच्या मागील बाजूस लटकून प्रवास करताना दिसत आहेत. बस स्थानक परिसरात ही वाहने रस्त्याच्या कडेला न लावता मुख्य रस्त्यात उभी केली जातात. आणि त्यातून मार्गाक्रमण करणाºया बसेमुळे या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी होवून अपघात होताना दिसतात. या परिसरात वाहतूक पोलीस असूनदेखील ते बघ्याची भूमिका घेणे पसंत करतात.
शहरातील मध्यभागी असलेला गांधी पुतळा परिसरात एकेरी वाहतूक मार्ग असूनदेखील वाहनधारक नियम मोडतांना दिसून येतात. तसेच डायमंड बेकरी जवळ तीन चाकी वाहनांना प्रवेश बंदी असून, दिवसभर मोठ्या वाहनांची वाहतूक मार्गावर होत असल्यामुळे वाहतुकीची नेहमीच कोंडी होत असते.
शासनाच्या आदेशानुसार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह व महाराष्ट्र रस्ता सुरक्षा अभियान जानेवारी महिन्या ऐवजी फेब्रुवारी महिन्यात राबविण्यात येत आहे. या अभियानात वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याकडे लक्ष केंद्रीत केले जात असून, यासाठी वाहतूक पोलिसांकडूनही पुढाकार घेतला जात आहे. मात्र वाहनधारकांमध्ये याविषयी जनजागृती न झाल्याने शहरातील बहुसंख्य वाहनधारक शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवत असल्याचे चित्र आहे. या सोबतच खाजगी वाहतूक करणारी वाहने बेशिस्तपणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करून नियम पायदळी तुडवत आहेत. यामुळे रस्ता सुरक्षा सप्ताह राबवून नेमके काय साधले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रस्ता सुरक्षा सप्ताहात पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनधारकां विरूद्ध कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, असे झाल्यास अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल. नागरिकांनी स्वत: सह इतरांचे जीव धोक्यात येणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे, असे झाल्यास वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होईल.
सप्ताहाच्या कार्यक्रमात वाहतुकीचे नियम न पाळल्याने होणारे अपघात आणि त्यात जाणारे जीव यावर बरेच विचारमंथनदेखील झाले. जिल्हा प्रशासन व वरिष्ठांनीही काही आदेश दिले असून, त्यांची अंमलबजावणी होईल तेव्हा होईल किमान सप्ताहात तरी सार्वजनिक वाहतूक करणाºया विभागाने या सप्ताहाच्या सन्मान ठेवणे आवश्यक असताना तसे होताना दिसून येत नसल्याची स्थिती आहे. वरिष्ठांनी आदेश देऊन देखील कोणत्याही प्रकारे रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती किंवा मोहीम यशस्वी होताना दिसत नाही.