ब्राह्मणपुरी परिसरात बिबट्याचा संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:32 IST2021-01-25T04:32:50+5:302021-01-25T04:32:50+5:30
ब्राह्मणपुरीसह चांदसैली, गोदीपूर शिवारातील भागात बिबट्यांचा संचार वाढला आहे. सध्या शेतीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. हे बिबटे मजुरांना ...

ब्राह्मणपुरी परिसरात बिबट्याचा संचार
ब्राह्मणपुरीसह चांदसैली, गोदीपूर शिवारातील भागात बिबट्यांचा संचार वाढला आहे. सध्या शेतीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. हे बिबटे मजुरांना दिसत असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मजूर शेतकाम करण्यासाठी नकार देत असल्याने शेतीकामावर मोठा परिणाम दिसून येत आहे. ब्राह्मणपुरीसह परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून बोलले जात आहे. ब्राह्मणपुरी गावानजीक चांदसैली शिवारात घोडा बिबट्याने फस्त केल्याची घटना आठ दिवसापूर्वीच घडली होती. त्यानंतर गोदीपूर गावानजीक शेळीवर हल्ला करीत शेळी ठार केल्याची घटना घडली होती. रविवारी पाच ते सहा मजूर ब्राह्मणपुरी गावानजीक असलेल्या शेतात निंदणीसाठी जात असताना एका १० वर्षीय बालिकेसमोर बिबट्या येऊन ठेपला. मात्र बिबट्याला ससा दिसल्याने तो ससा तोंडात धरून जवळील केळीच्या शेतात पसार झाला. जर बालिकेवर बिबट्याने झडप घेतली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. या घटनांमुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जर हे बिबटे गावात शिरुन मानवावर हल्ला केला तर याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे वन विभागाने या बिबट्यांना वेळीच जेरबंद करून बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.